जिल्हा परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे नसून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचे चार गुन्हे दाखल करण्यात आले असले, तरी अद्याप एकाही संशयिताला अटक झालेली नाही.

निफाड

तालुक्यातील तामसवाडी परिसरात पीडित महिला कुटुंबासमवेत राहते. परिसरात राहणाऱ्या संशयित संदीप आरोटेने पीडित महिलेच्या घरात शिरून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तू भ्रमणध्वनीवर माझ्याशी का बोलत नाही, अशी विचारणा करत तिचा विनयभंग केला. पीडित महिलेचा पती हा प्रकार थांबविण्यासाठी गेला असता आरोटेने त्यांना मारहाण केली. पीडित महिलेलाही मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. समाजात बदनामी करण्याची धमकी देत तो निघून गेला. याआधीही महिनाभर संदीपने पीडित महिलेला वेळोवेळी त्रास दिला आहे. मारहाणीमुळे महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून बरे वाटू लागल्याने तिने सायखेडा पोलीस ठाण्यात संदीपविरोधात विनयभंग, मारहाणीची तक्रार दाखल केली.अजून एका घटनेत तालुक्यातील विवाहितेच्या कुटुंबाचा गायकवाड कुटुंबासोबत वाद आहे. रविवारी रात्री विवाहिता घरी एकटी असताना ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष गायकवाड, जुन्याबाई गायकवाड अचानक घरात शिरले. विवाहितेला मारहाण करून जखमी केले. याविरोधात लासलगांव पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळवण

दुसरी घटना कळवण तालुक्यातील पाळे येथे घडली. पीडित महिला रात्री नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडली असता त्याच परिसरात राहणाऱ्या संशयित दीपक गांगुर्डे, सौरभ गांगुर्डे यांनी तिला पकडत विनयभंग आणि शिवीगाळ केली. महिलेने याविरोधात कळवण पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा साखर कारखाना वसाहतीत पीडित युवती आपल्या कुटुंबासमवेत राहते. युवतीच्या वडिलांचा संशयित प्रभाकर ऊर्फ केदा सोनवणे यासोबत काही वाद होता. मालेगाव येथे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. तक्रारीचा राग आल्याने सोनवणे हा पीडित युवतीच्या घरासमोरील आवारात आला. गल्लीतील लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी युवती काय झाले हे पाहण्यासाठी घराबाहेर आली असता तिचा हात धरून विनयभंग केला. पोलीसही आपले काही करू शकत नसल्याची धमकी त्याने दिली. हा प्रकार थांबविण्यासाठी काही महिला पुढे आल्या असता लज्जा येईल असे आक्षेपार्ह कृत्य सोनवणे याने केले. सोनवणेविरुद्ध  पीडितेने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना मालेगाव येथील रमजानपुरा भागात घडली. अल्पवयीन १५ वर्षांच्या मुलाने त्याच पहिसरातील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बालिकेने रडण्यास सुरुवात केल्याने अल्पवयीन मुलाने घाबरून तिला घराबाहेर काढले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. बालिकेने घरी हा प्रकार आईला सांगितल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी  विधीसंघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने मोटारीत बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिखरेवाडी परिसरात घडली. सोमवारी दुपारी मुलगी पायी जात असतांना पाठीमागून कारमधून आलेल्या अंबादास काळे या परिचिताने तिचा हात पकडून बळजबरीने मोटारीत बसवून मान दाबून धरली. उद्यानात बसू, असे सांगत त्याने पाथर्डी फाटय़ापर्यंत मुलीला मोटारीतून नेले. पाथर्डी फाटा येथे संशयित चालकास कोणाचा तरी दूरध्वनी आल्याने मुलीला शिखरेवाडी येथील गार्डन भागात सोडून देत त्यांनी पलायन केले. ही बाब मुलीने घरी सांगितल्यावर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अंबादास काळे (गौतमनगर,गोरेवाडी) आणि मोटार चालक यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेचे पाईप लंपास

झोपडपट्टीत पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे पाईप चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील शांतीनगर भागात घडली. या बाबत पालिकेचे कर्मचारी आशीष भावसार यांनी तक्रार दिली. घरकुल आवास योजनेमुळे रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाल्याने स्थानिक नागरिक स्थलांतरीत झाले आहेत. हे लक्षात घेऊन चोरटय़ांनी झोपडपट्टीला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीचे पाईप पळवून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीत वृद्धाची आत्महत्या

विषारी औषध सेवन करून ६५ वर्षांच्या वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना शांतीनगर भागातील घाडगे मळा परिसरात घडली. भास्कर गोरे असे त्यांचे नाव आहे. गोरे यांनी सोमवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात येताच मुलगा नवनाथने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

विजेच्या धक्क्य़ाने मुलाचा मृत्यू

पाण्याच्या मोटरची पिन काढत असताना विजेचा धक्का लागून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शिंदे गावात घडली.

सागर विजय मोरे (मारुती मंदिराजवळ, शिंदेगाव) असे या मुलाचे नाव आहे. सागर सोमवारी सकाळी पाण्याच्या मोटरची पिन काढत असताना त्याला विजेचा धक्का बसला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनसाखळी खेचून पलायन

किराणा दुकानातून सामान घेऊन घराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्य़ातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेल्याची घटना हॉटेल आठवण भागात घडली. याबाबत सरिता वावदे यांनी तक्रार दिली. वावदे यांच्या सासू रोहिणी गांगुर्डे या आपल्या घराजवळील किराणा दुकानातून माल घेऊन घराकडे येत असतांना दुचाकीवरून आलेल्या भामटय़ांनी त्यांच्या गळ्य़ातील सुमारे ३० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी खेचून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.