शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंद्यांवर वारंवार छापे टाकून कारवाई केली जाते. तथापि, हे प्रकार नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी आता अवैध धंदे चालविणाऱ्यांवर थेट तडीपारीचा बडगा उगारला आहे. सलीम अब्दुल रेहमान पठाण याच्या टोळीशी निगडित १३ सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नाशिक शहर, जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले आहे.

या कारवाईची माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून सातत्याने कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने परिमंडल एकमधील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्य़ांच्या अभिलेखाची पडताळणी करून सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीच्या कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आले.

परिमंडळ एकमधील अवैध जुगार, धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी हे व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांच्या अभिलेखाची पडताळणी करण्यात आली. त्यात टोळीप्रमुख सलीम अब्दुल रेहमान पठाण (४७, भद्रकाली), धर्मा ऊर्फ धर्मराज सोनवणे (३५, गंगापूर), अशोक ऊर्फ सुभाष महाले (४०, फुलेनगर), किशोर आहेर (३७, खडकाळी), उत्तम वाघ (५०, बागवानपूरा), भारत भडांगे (३२, जगतापवाडी), परसराम आव्हाड (३३, जुने नाशिक), रियाज अजीज शेख (३२, खडकाळी), मच्छिंद्र खांबेकर (४५, बुधवार पेठ), सचिन इंगोले (२०, जुने नाशिक), अजीज गनी शेख (४२, बडी दर्गा), विष्णू आदमाने (२५, निलगिरी बाग) या १३ जणांविरोधात २०१५ आणि २०१८ मध्ये अवैध जुगाराचे १४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या पाश्र्वभूमीवर, टोळीच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यासाठी चौकशी करण्यात आली. चौकशीअंती टोळीचा म्होरक्या सलीम अब्दुल रहमान पठाण आणि त्याच्या १३ साथीदारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शहर, जिल्ह्य़ातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधितांना ताब्यात घेऊन ते ज्या ठिकाणी जाण्यास इच्छुक आहेत, त्या ठिकाणी सोडून देण्याची कारवाई केली जात आहे. दरम्यान, यापूर्वी भद्रकाली, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांच्या हद्दपार प्रस्तावातील एकूण ३० सदस्यांना सहा महिने कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.

दोन वर्षांत ८० गुन्हेगार तडीपार

शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत २०१७ मध्ये २३, तर चालू वर्षांत २०१८ मध्ये आतापर्यंत ५७ असे एकूण ८० सराईत गुन्हेगारांना नाशिक शहर, जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच अद्याप नऊ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई प्रस्तावित असून त्यांची तडीपार चौकशीची कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.