शहर परिसरात वाहन चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून आठ लाख १५ हजार रुपयांच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. टोळीतील मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शहरात घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकरणात सामील असणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना गुन्हे शाखा-२ ला देण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित आकाश मराठे (२०, रा. महाराणाप्रताप चौक) याला काठेगल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने नाशिक शहर तसेच धुळे, शिरपूर, चाळीसगांव या परिसरातून संशयित उमेश ऊर्फ पप्पू मोरे (रा. धुळे), शरद बुवा (रा. धुळे), राहुल वाघ (रा. शिरपूर) यांच्या मदतीने १५ दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी चारही संशयितांकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या. त्यांची अंदाजे किंमत आठ लाख १५ हजार रुपये आहे.

दुचाकी चोरीच्या दोन घटना

दरम्यान, आडगाव आणि अंबड पोलिसात दोन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. शुभम घोरवाड (रा.साईपूजा, जत्रा हॉटेलसमोर) यांची युनिकॉर्न दुचाकी १५ जूनच्या रात्री त्यांच्या इमारतीच्या वाहनतळात  लावलेली असताना चोरण्यात आली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना औद्योगिक वसाहतीत घडली. विल्होळी येथील सोमनाथ चंद्रे हे रविवारी सकाळी औद्योगिक वसाहतीतील मुंगी इंजिनीअर प्रा.लि. या कारखान्यात कामावर गेले होते. दुपारी कारखाना परिसरात लावलेली त्यांची पॅशन प्रो  चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुशिक्षितांकडून गंमत म्हणून चोरी

दुचाकी चोरीतील संशयित आकाश मराठेचे डी.एम.एल.टी. चे शिक्षण सुरू आहे. घरची परिस्थिती साधारण असल्याने तो एका डॉक्टरांकडे काम करत होता, परंतु संशयावरून डॉक्टरांनी त्याला कामावरून काढून टाकले. गंमत म्हणून त्याने सुरुवातीला वाहनांमधील पेट्रोल चोरण्यास सुरुवात केली. नंतर त्याने दुचाकीचे हॅन्डल तोडण्याची चाचपणी सुरू केली. यासाठी मुख्य सूत्रधाराच्या मदतीने वेगवेगळ्या कल्पना सुचविल्याने अ‍ॅक्टिव्हा, पल्सर, शाईनसारख्या महागडय़ा गाडय़ांचे हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे शिकला. हे काम करताना त्याने पदविकाधारक उमेशची मदत घेतली. दोघे मिळून मुख्य सूत्रधार सांगेल त्या पद्धतीने गाडय़ांची चोरी करण्यास शिकले. चोरीच्या गाडय़ा विकण्यासाठी त्यांनी धुळे येथील मित्र शरद आणि राहुल यांची मदत घेतली.  यासाठी मुख्य सूत्रधाराकडून त्यांना मदत करण्यात येत होती. वाहने चोरून शहर परिसरातील कुठल्याही वाहनतळावर ती उभी करत. साधारणत: सहा ते सात दिवसांत त्या वाहनाला ग्राहक मिळाले की थेट वाहनतळावरून वाहन उचलून गाडीत टाकले जात असे. चोरलेल्या वाहनाचा क्रमांक दुसऱ्या दुचाकीला लावल्याने वाहन चोरीचा तपास पोलिसांच्या दृष्टीने आव्हान ठरले होते. वाहन चोरीतील चौघे संशयित अवघ्या १९ ते २० वर्षांचे आहेत.