गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयवंत देशमुख (५६, अंकिता अपार्टमेंट, सावरकरनगर) असे या  अभियंत्याचे नाव आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात संशयित अभियंता कार्यरत आहे. २००९ मध्ये जयवंत देशमुख यांच्या संपत्तीबाबत साशंकता निर्माण झाल्याने त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी  लाचलुचपत प्रतिबंधक खात्यास गुप्त चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत देशमुख यांचे उत्पन्न स्रोतापेक्षा १६ लाख ६७ हजार ४१५ रुपये इतकी बेहिशेबी संपत्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्यास आढळून आली. त्यावरुन या प्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आली.

देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या  बांधकाम विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत असताना पदाचा गैरवापर केला.  या गैरवापराने त्यांनी २० मे १९८६ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत ही बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर कांबळे यांनी देशमुख यांच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर  गंगापूर पोलीसांनी जयवंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.