१० वर्षांच्या दोन मुलांचा समावेश

शहर परिसरात रात्रीच्या वेळी खिडक्यांचे गज कापत घरात प्रवेश करून दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी छडा लावला असून  कारवाईत शहर परिसरात ठिकठिकाणी केलेल्या घरफोडीतून जमविलेले २४ लाख १०  हजार रुपये किंमतीचे ६५२ ग्रॅम सोने आणि गुन्ह्य़ात वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून  चोरीसाठी वापर होणाऱ्या १० वर्षांच्या दोन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

अंबड येथे झालेल्या घरफोडी संदर्भात पोलिसांचा तपास सुरू असतांना गुन्हे शोध पथकाला या संदर्भात विधीसंघर्षित बालकांचा या मध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाली. घरफोडीत चोरलेले ४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नऊ भ्रमणध्वनी त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून इतर दोघांची माहिती घेतली असता त्यावरुन तीन दिवस पोलिसांनी दत्त चौक परिसरात सापळा रचला. पोलिसांनी व्ही. एन. नाईक विद्यालयाजवळील त्याच्या राहत्या घरावर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने विकास झाडे (१९, रा. दत्त चौक) असे आपले नाव सांगितले. संशयित हा आकाश वानखेडे (रा. इंदिरानगर) याच्या मदतीने त्याच्याजवळील सफारी वाहनातून घरफोडय़ा करत असल्याची माहिती त्याने दिली. दिवसभर वाहन अंबड, अश्विन नगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक, सहावी स्कीम, पाटीलनगर या ठिकाणी फिरवून टेहेळणी करत रात्रीच्या वेळी घरफोडी करायची, अशी पध्दत होती, अशी कबुली विकासने दिली. त्याचा साथीदार आकाशला त्र्यंबकेश्वर येथे वाहनासह ताब्यात घेतले. वाहनात घरफोडीसाठी लागणारे कटावणीसह टोकदार साहित्य मिळाले.

दोन्ही संशयितांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत डिसेंबर ते आजपर्यंत झालेल्या १३ घरफोडय़ांची कबुली दिली. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम आणि टाटा सफारी असा एकूण २४  लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

खाऊसाठी चोरी

खाऊसाठी आई-वडील पैसे देत नाही म्हणून ही मुले चोरी करीत होती. एका मोठय़ा मुलाच्या मदतीने कटावणीने खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत दागिने ते लंपास करत. हे दागिने कुठे ठेवले हे कळू नये यासाठी हे दागिने  एका डब्यात ठेवून तो जमिनीत पुरला जात असे, अशी माहिती या मुलांनी पोलिसांना दिली.