गणेशोत्सवानिमित्त होणारी स्पर्धा पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देतानाच सर्जनतेला प्रोत्साहन देते. त्यामुळे सातत्याने बाप्पांसाठी नवे काही करण्याची ऊर्मी मिळते, अशी भावना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि दै. ‘लोकसत्ता’ यांच्यातर्फे आयोजित ‘पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धे’च्या नाशिक विभागातील विजेत्यांनी व्यक्त केली.
यंदाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने लोकसत्ताने पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते. नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागांत ही स्पर्धा घेण्यात आली. नाशिक विभागाचा विचार करता शहरासह जिल्ह्य़ातून स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी नाशिक विभागातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. थर्माकॉलची मंदिरे, आकर्षक रंगीत दीपमाळा, रंगबेरंगी प्लास्टिकची चमकणारी तोरणे याचा परीघ ओलांडत बाप्पाच्या अनेक भक्तांनी घरगुती गणेशोत्सव पर्यावरणपूरक राहील याकडे कटाक्ष ठेवला.
सजावटीत पूजेचे साहित्यातील दिवे, तामण, तांब्या, भाजीपाला, शिवणकामात उरलेल्या कापडापासून किराणा मालात विविध वाण सामानातून घरी येणारी कागदे आदी साहित्याचा वापर करण्यात आला. स्पर्धेत लासलगावचे जयंत कापसे प्रथम तर द्वितीय क्रमांक नाशिकरोडचे विशाल पाटील यांनी पटकावला. तसेच निर्मल अष्टपुत्रे, दर्शना राजपूत, वर्षां सातवेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. पहिल्या दोन पारितोषिकांचे स्वरूप अनुक्रमे नऊ हजार ९९९ आणि सहा हजार ६६६ असे तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी दोन हजार एक रुपये, सन्मानपत्र असे होते. या वेळी विजेत्यांनी आपली भावना व्यक्त केली. स्पर्धेत सहभागी होण्याची उत्सुकता होती. विजेते ठरू किंवा नाही यापेक्षा काही तरी वेगळे असे पर्यावरणपूरक करायचे होते. पर्यावरणपूरक म्हटले की, समोर येणारी यादी पाहून हे साहित्य ग्रामीण भागांत मिळवायचे कसे, असा प्रश्न समोर येतो. त्यामुळे आपण घरात दर महिन्याला येणाऱ्या वाण सामानातील रंगीत कागद, कागदी खोके याचा वापर करून ‘गणपती’ तयार केल्याचे कापसे यांनी सांगितले.
त्याच्या सजावटीसाठी पाने, फुले आदींचा वापर केला. पर्यावरणपूरक स्पर्धा होणे गरजेचे असून या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन होते, असे कापसे यांनी नमूद केले. पाटील यांनी पर्यावरणपूरक संकल्पनेचा गवगवा होत असला तरी अद्याप त्याविषयी जागरूकता नसल्याचे मत मांडले. या स्पर्धेच्या माध्यमातून हे कौशल्य जोपासले जाईल, या इच्छेने स्पर्धेत सहभागी झालो. यासाठी घरातील पूजेच्या सामानातील तांब्या, पितळ्याच्या समई, दिवे, क्रिस्टल ग्लोब, पूजेच्या पादुका, शंख, शिंपले, छोटे तांबे, नथ, राखी आदींचा वापर करून बाप्पाच्या मूर्त रूपाला आकार देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.