पर्यावरणस्नेही सजावटीत कल्पकतेचे प्रतिबिंब

निसर्गाने दिलेल्या सहा मोफत डॉक्टरांची संकल्पना देखाव्यातून अनोख्या पद्धतीने मांडणाऱ्या अपर्णा नाईक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत ‘लोकसत्ता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव’ स्पर्धेच्या नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला. प्लास्टिक बंदीविषयी संदेश देत पर्यावरणस्नेही सामग्रीतून आरास साकारणारे विवेक रोजेकर हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील पुरस्कार्थीना सोमवारी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी दै. ‘लोकसत्ता’तर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. स्पर्धेत नाशिक विभागातून पारितोषिक मिळवणाऱ्या स्पर्धकांना संपादकीय विभागप्रमुख अविनाश पाटील, जाहिरात विभागाचे राहुल पंडित आणि मनोज मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रथम पारितोषिक अपर्णा नाईक यांना मिळाले. रुपये नऊ हजार ९९९ रकमेचा धनादेश, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. द्वितीय पारितोषिक विवेक रोजेकर यांच्या देखाव्याला मिळाले. रुपये सहा हजार ६६६ रकमेचा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी अनिकेत मुळे, पंकज थोरात, महेंद्र पांगारकर यांनी निर्मिलेल्या देखाव्यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी रुपये २००१, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

घरगुती गणेशोत्सवात भक्त वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणतात. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, आहार, व्यायाम आणि विश्रांती हे निसर्गदत्त सहा डॉक्टर. त्यांच्याशी मैत्री केल्यास आजाराची धास्ती राहणार नसल्याचा संदेश प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नाईक यांनी देखाव्यातून दिला. जीवन आरोग्यदायी होण्यासाठी काय करता येईल, याची माहिती देखाव्यातून दिली गेली. आरास बनविण्यास महिनाभराचा कालावधी लागला. त्यासाठी कार्डशिट, घरगुती साहित्य वापरले गेले. रोजेकर यांनी आरासमधून प्लास्टिक बंदीवर जनजागृती केली. कार्डशीटवर वेगवेगळे संदेश देताना शाडू माती आणि कापसाचा वापर गणेशासह इतर मूर्ती साकारण्यासाठी केला. पत्रावळी, सुतळी, गव्हाची खळ अशा सामग्रीचा वापर केला. ठरवले तर प्लास्टिक वापरणे टाळता येते. गणेश आरास पहावयास येणाऱ्यांना कापडी पिशवी देऊन प्लास्टिकचा वापर टाळण्यास त्यांनी प्रोत्साहित केले. पांगारकर यांनी रद्दी कागदांच्या सहाय्याने गणेश मूर्ती साकारली. दोन उंदीरही स्थानापन्न केले. केवळ १०० रुपयांत त्यांनी ही सजावट केली. अनिकेत मुळे यांनी म्हैसूर पेंटिंगच्या धर्तीवर साईबाबा मंदिर, तर पंकज थोरात यांनी आईस्क्रिम कांडय़ांच्या सहाय्याने मंदिर निर्मिती केली.