आजची पिढी विविध विषयांना सर्वागाने भिडते. नाटकांसाठी लागणारी ऊर्जा त्यांच्यात आहे. संहितालेखनापासून दिग्दर्शनापर्यंत सर्व तांत्रिक बाजू समजावून घेताना नाटक कोणत्या ढंगात सादर करायचे, याचा विचार तरुणांमध्ये रुजतोय. आता त्यांनी त्या विचारांवर जोमाने काम करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत  परीक्षकांनी व्यक्त केली.

नाशिक विभागीय प्राथमिक फेरीस सोमवारी येथील अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सभागृहात उत्साहात सुरुवात झाली. परीक्षक म्हणून डॉ. अनिल बांदिवडेकर व नीलकंठ कदम काम पाहात आहेत, तर आयरीसच्या वतीने विद्याधर पाठारे, विवेक रानवडे, हेमंत गव्हाणे उपस्थित होते. पहिल्या दिवशी शहरातील १० महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यात बीवायके महाविद्यालयाची ‘लाइफ मेट्स’, हंप्राठा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयाची ‘ब्रेकिंग न्यूज’, क. का. वाघ संगीतशास्त्र महाविद्यालयाची ‘मजार’, त्र्यंबकेश्वर विद्यालयाची ‘जवस’, क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्सची ‘१२ किमी’, भोसला सैनिकी महाविद्यालयाची ‘माय व्हॅलेंटाइन’, मविप्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची ‘प्रारब्ध’, केटीएचएम महाविद्यालयाची ‘वेटिंग फॉर सेन्सेशन’ आणि भोसला महाविद्यालयाची ‘लिपस्टिक’ यांचा समावेश होता. परीक्षक नीलकंठ कदम यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण उत्तम असल्याचे सांगितले. मुलांमध्ये ऊर्जा प्रचंड असून ती या स्पर्धेच्या माध्यमातून टिकून राहणे गरजेचे आहे. डॉ. बांदिवडेकर यांनी विषयांत वैविध्य असून स्थानिक लेखकांचा प्रभाव प्रकर्षांने जाणवतो असे नमूद केले.

सॉफ्ट कॉर्नरप्रस्तुत आणि

‘केसरी’, ‘क्रिएटीव्ह अकॅडमी’ पुणे व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत आयरीस प्रॉडक्शन हे टॅलेन्ट पार्टनर म्हणून सहभागी आहे. तसेच अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने आठ केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे.

आज नगरमध्ये प्राथमिक फेरी

सुट्टी खुंटीला टांगून रविवारी ठाण्यात ‘लोकसत्ता लोकांकिका’ची जोरदार नांदी केल्यानंतर आणि आठवडय़ाची सुरूवात नाशिकमधील प्राथमिक फेरीने झाल्यानंतर आज नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, न्यू टिळक रोड येथे सकाळी ११ वाजल्यापासून प्राथमिक सत्र रंगणार आहे.

राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत या स्पर्धेचे सळसळते वारे वेगाने पोहोचले आहेत.