‘लोकसत्ता’ला स्पर्धकांकडून सर्वाधिक पसंती; बातमीपासून जाहिरातींपर्यंतचा सूक्ष्म अभ्यास
आजच्या तरुणाईची समाज माध्यमावरील भटकंती पाहता ही पिढी वाचते काय, या विषयी बऱ्याचदा साशंकता व्यक्त केली जाते. सर्वसामान्यांचा हा गैरसमज मोडीत काढत युवकांनी विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्या या माध्यमांविषयी असणारी त्यांची मते स्पष्टपणे मांडत माध्यम जगतातील त्यांची वाचक तसेच प्रेक्षक म्हणून असलेली भूमिका अधोरेखित केली. निमित्त होते, हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयातर्फे बुधवारी आयोजित ‘मीडियावर बोलू काही’ या अनोख्या स्पर्धेचे. विशेष म्हणजे, मुद्रित माध्यमासाठीच्या स्पर्धेत सर्वाधिक स्पर्धकांनी ‘लोकसत्ता’वर शिक्कामोर्तब केले.
शहरातील हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयात सध्या ड्ेजचा माहोल आहे. यानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांत दरवर्षी ‘बातमी वाचन’ स्पर्धा घेतली जाते. यंदा मात्र स्पर्धेचे स्वरूप बदलत आपल्याला आवडणारे एखादे वृत्तपत्र, वृत्तवाहिनी या विषयावर तीन मिनिटे बोलायचे असा विषय देण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या वाचनाचा कल, अभिरुची समजेल. स्पर्धेमुळे विद्यार्थी विश्वात वृत्तपत्रीय वाचन म्हणजे चित्र-नाटय़ जाहिराती, वेगवेगळ्या प्रदर्शनाच्या बातम्या, छायाचित्रांची पाहणी किंवा वरवर पाने पलटणे इथपर्यंत मर्यादित नसून वृत्तपत्राच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानावरील प्रेसलाइनपर्यंत विद्यार्थी विविध विषयांवरील लेख, प्रासंगिक लेखन, पुरवण्या यासह अग्रलेख आदी लेखन वाचतात हे प्रकर्षांने पुढे आले. बहुतांश विद्यार्थ्यांनी या वेळी आपणास ‘लोकसत्ता’ आवडत असल्याचे आवर्जून नमूद केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमात एबीपी माझा आणि झी २४ तास या वृत्तवाहिनींचा उल्लेख केला. एखाद्या घटनेचे वृत्तांकन इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सचित्र दिसत असले तरी त्याची सखोल माहिती ‘लोकसत्ता’ वाचल्याशिवाय होत नाही. योग्य समतोल विचार मांडताना समाजजीवनाचे प्रतिबिंब त्या वृत्तपत्रात उमटते. लोकसत्ता एक संवेदनशील वृत्तपत्र असून उत्तम वाचक घडविण्याची जबाबदारी या एकमेव दैनिकाकडे असल्याचे वाटते. राज्यस्तरीय वृत्तपत्र असून स्थानिक बातम्या फारशा नसल्याने तो सर्वाच्या नाही तर केवळ दर्दीच्या हाती दिसेल अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. तरुणाईला व्यासपीठ मिळावे यासाठी लोकसत्ता लोकांकिका, वक्तृत्व स्पर्धा आणि आता ब्लॉग बेंचर्स यासह प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अपेक्षा लक्षात घेत विविध सदरे, पुरवण्या आदींचा उल्लेख विद्यार्थ्यांनी केला. अनेकांनी ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख हे नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध, घटनेची दुसरी बाजू सांगणारे असतात याकडे लक्ष वेधले. ज्यात वेगळे पैलू समजतात. त्यात कधीच कोणाची बाजू न घेता तटस्थपणे आपले म्हणणे मांडले जाते असे अनेकांनी सांगितले.
स्पर्धकांनी आपल्या आवडणाऱ्या वृत्तपत्रांचा इतिहास, स्थापना, त्यामागील पाश्र्वभूमी, वैचारिक समज यासह विविध सदरांकडे लक्ष वेधले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राची साने, ज्योती पठारे, किरण पाटील, लिना केंगे, धनश्री इंगळे यांनी काम पाहिले. या वेळी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, वृत्तपत्र विद्या विभागप्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, विनिता सिंग, उपप्राचार्य आर. एस. खंडेलवाल आदी उपस्थित होते.
बहुभाषिक अंक
नामदार गोपाळकृष्ण गोखले जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत बुधवार ते शुक्रवार या कालावधीत वृत्तपत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व समाचारपत्र संग्रहालयाचे संस्थापक मोतीराम जठार यांनी संग्रहित केलेले मराठी, आसामी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, कन्नड, गुजराथी, जर्मन, कोकणी, मल्याळम, देवनागरी, मारवाडी, नेपाळी, उडीया, संस्कृत, फारशी, पंजाबी, गोरखा, तेलगु, उर्दू, डच, लॅटीन यासह ब्रेल लिपीमधील काही अंक असे विविध भाषेतील ७०० निवडक अंक उपलब्ध आहेत.