News Flash

विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहाने चैतन्य

सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ घेत त्याचे नाटकाच्या माध्यमातून उमटणारे प्रतिबिंब..

‘पाऊस वाचताना.. मुडपलेलं पान’ एकांकिकेतील एक दृश्य. (छाया - मयूर बारगजे)

‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय फेरीचा पहिला दिवस

सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ घेत त्याचे नाटकाच्या माध्यमातून उमटणारे प्रतिबिंब.. त्या वातावरणाची निर्मिती होण्यासाठी दिलेली संगीताची साथ.. संवादाची रंगलेली जुगलबंदी.. दुसरीकडे नेपथ्यरचना चांगली व्हावी, म्हणून साहित्याची जुळवाजुळव.. ऐनवेळी संवाद विसरल्याने कलावंताचा झालेला हिरमोड.. शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असणाऱ्या तालमी.. परीक्षकांनी वेळोवेळी केलेल्या सूचना अन् दिलेला कानमंत्र यातून लोकांकिकेचा आरसा स्पर्धकांना खऱ्या अर्थाने अनुभवता आला.. निमित्त होते, सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटीव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीचे.

सोमवारी प्राथमिक फेरीला उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेसाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेची नांदी बीवायके महाविद्यालयाच्या ‘लाईफ मेट्स’ एकांकिकेने झाली. सहा जणींचे समांतर चालणारे आयुष्य, त्यांना मैत्री आणि आपुलकीचा जोडणारा धागा व त्यातून विणलेली नात्यांची वीण यावर त्यात भाष्य करण्यात आले. हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष विज्ञान महाविद्यालयाच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये वरकरणी सत्य वाटणाऱ्या घटनेला लाभलेले विविध आयाम, त्यातून सामाजिक ते राजकीय होणारा प्रवास याकडे लक्ष वेधण्यात आले. क. का. वाघ संगीतशास्त्र महाविद्यालयाच्या ‘मजार’ एकांकिकेत पाकिस्तान-भारत सीमारेषेवर पाकिस्तानातील हिंदू मुलगी आणि भारतातील मुस्लीम सैनिक यांच्यात झालेला संवाद अधोरेखित करण्यात आला. क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्सच्या ‘१२ किमी’सह एकूण १० एकांकिका सादर झाल्या. यावेळी परीक्षकांसमोर स्पर्धकांचा कस लागला. स्पर्धेचे दडपण, उत्साह या संमिश्र वातावरणात काही स्पर्धक आपले संवाद विसरले. मात्र ती वेळ त्यांच्या सहकाऱ्यांनी निभावून नेली. वेळोवेळी झालेल्या रंगीत तालमींचा स्पर्धकांना फायदा झाला.

परीक्षकांच्या सूचना आणि सराव यामुळे पुढील काळात रंगमंचावरील प्रवासास फायदाच होईल, असा विश्वास स्पर्धकांनी व्यक्त केला. परीक्षकांनी स्पर्धकांचे वेगळेपण टिपत नेपथ्य रचनेपासून वेशभूषा, संगीत यासह अन्य तांत्रिक गोष्टींवर स्पर्धकांनी घेतलेल्या मेहनतीचा, संहितेतील वैविध्यतेचा आर्वजून उल्लेख केला. देहबोली, आवाजातील आरोह अवरोह यावर स्पर्धकांनी मेहनत घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून डॉ. अनिल बांदिवडेकर व निळकंठ कदम यांनी काम पाहिले. आयरिसच्यावतीने विद्याधर पाठारे, विवेक रानवडे, हेमंत गव्हाणे उपस्थित होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:25 am

Web Title: loksatta lokankika 2016 nashik division
Next Stories
1 नाशिकच्या एकांकिकांमधून वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी
2 उत्तर महाराष्ट्रात भाजपबरोबरच सेनेची मुसंडी
3 ‘लोकसत्ता लोकांकिका’चा नाशिकमध्ये उत्साह
Just Now!
X