लोकसत्ता लोकांकिका विभागीय प्राथमिक फेरी

नाशिक : ‘इस आझादी के और कितने तोहफे मिलना बाकी हैं ?’, ‘जगणं तसं सोपं आहे, फक्त त्याचा आनंद घ्यायला शिक’, ‘नजरेस पडलेल्या पण नजरेत न आलेल्या गोष्टीतून समोर येतं ते निखळ सत्य’, ‘आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही’ या आणि अशा अनेक भरभक्कम संवादांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय  प्राथमिक फेरीचा पहिला दिवस गाजला. नाटय़ क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना केवळ ‘रंगमंच खुणावतो’ या उर्मीने अभिनयाच्या जोरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी  सहभाग घेत स्पर्धेतील चुरस वाढवली आहे.

सोमवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरातील अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद शाखेच्या सभागृहात प्राथमिक फेरीला उत्साहात सुरूवात झाली. परीक्षकांच्या हस्ते नटराजाचे पूजन आणि दीपप्रज्वलनानंतर लोकांकिकांना सुरूवात झाली. पहिल्या दिवशी भोसला कनिष्ठ महाविद्यालयाची ‘खेळ तारूण्याचा’, के.टी.एच.एम. महाविद्यालयाची ‘खोल दो’, धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयाची ‘वेन्डेट्टा’, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाची ‘मिसा’ आणि मालेगाव येथील म. स. गा. महाविद्यालयाची ‘सुसाईड ब्रीज’ या एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेआधी मिळालेल्या थोडय़ा वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाविद्यालयांचे संघ सकाळपासूनच कालिदास कलामंदिराच्या आवारात दाखल झाले होते. स्पर्धेविषयी अनेकांच्या मनात कुतूहल, अनामिक भीती होती. काहींनी प्राथमिक फेरीसाठी किमान नेपथ्य रचना ठेवत वेशभूषा, संहिता, अभिनय यावर लक्ष केंद्रित केले. काहींनी अभिनयाच्या माध्यमातून संहितेचा आशय परीक्षक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. एकांकिका वेळेत पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांची नेपथ्यापासूनची धडपड, नाटय़परिषदेच्या सभागृहात तयार झालेली अघोषित ‘विंग’, त्यामधून आपल्या सहकाऱ्यांना गरजेचे साहित्य किंवा अन्य काही गोष्टींची आठवण करून देण्याचे काम सहकारी करत होते. दुसरीकडे, बाहेर स्पर्धक संघ काय तयारी करत आहे, त्यांचे सादरीकरण, विषय याचा कानोसा घेतला जात होता. काही मंडळी नेपथ्यासाठी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करण्यात मग्न राहिली.

दरम्यान, एकांकिका सादरीकरणात स्पर्धक संघाच्या चेहऱ्यावर असणारे कुतूहल पाहता परीक्षकांनी स्पर्धेचा मूलमंत्र स्पर्धकांना दिला.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.