लोकसत्ता लोकांकिका विभागीय स्पर्धा रंगली

नाशिक : गंभीर आणि विनोदी संवादांचे मिश्रण.. दमदार आणि जोरकस संवाद, अभिनय याला टाळ्या आणि शिट्टय़ांनी मिळणारी दाद.. युवावर्गासह ज्येष्ठांकडूनही मिळणारे प्रोत्साहन, अशा उत्साहाने सळसळत्या वातावरणात येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी रंगली.

विभागीय अंतिम फेरीचे उद्घाटन परीक्षक आणि दिग्दर्शक प्रताप फड, प्राजक्त देशमुख, ‘लोकसत्ताचे’ उपमहाव्यवस्थापक (वितरण) सुरेश बोडस, नाशिकचे मुख्य वितरक देवदत्त जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

कलामंदिराचा पडदा सरकल्यानंतर सुरू झाले युवा रंगकर्मीचे उत्साही सत्र. अंतिम फेरीत नाशिक येथील भि. य. क्ष. वाणिज्य महाविद्यालयाची ‘तुकाराम डाऊनलोडिंग’, हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयाची ‘चलो सफर करे’, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाची ‘लंगर’ आणि के. टी. एच. एम. महाविद्यालयाची ‘आपकी पसंद’ यांच्यामध्ये स्पर्धा रंगली. अंतिम फेरीत बाजी मारायची या ईर्षेने प्रत्येक संघ सक्रिय राहिला. यासाठी प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्यासह अन्य तांत्रिक बाजूकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. नव्या रंगकर्मीची ही धडपड, उत्साह, त्यांच्यातील ऊर्जा, वैचारिक गोंधळ परीक्षकांनीही अनुभवला.

परीक्षक प्रताप फड यांनी त्यांच्यातील चांगली वैशिष्टय़े मांडतानाच त्रुटीही दाखवून दिल्या. एखादी कलाकृती सादर करताना कलावंत म्हणून आपले स्वतचे काही येणे गरजेचे असते. बऱ्याचदा कोठे तरी काही पाहिलेले असते त्याची नक्रल करत आपण तेच पुढे रेटण्याचा प्रयत्न करतो. स्वतच्या भाषेत, स्वतच्या विचारात व्यक्त व्हा. नाटक किंवा एकांकिकेच्या तांत्रिक, लेखनाच्या चौकटी मोडत वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी दिला.

नाटय़ स्पर्धेतून कलावंत घडत जातो. वेगवेगळे प्रयोग करता येतात. स्पर्धेची रंगत अनुभवता येते. मात्र स्पर्धकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अन्यथा त्यांचे श्रम, केलेले काम वाया जाण्याची भीती आहे.  आपल्यातील खरा कलावंत शोधण्याचा प्रयत्न करा, असेही फड यांनी सांगितले. तर प्राजक्त देशमुख म्हणाले, सर्वच स्पर्धकांनी दमदार सादरीकरण केले. एकांकिका स्पर्धेकडे मुले गांभीर्याने पाहत असून नाटक किंवा एकांकिकेकडे, त्यातील तंत्राकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा कलावंत म्हणून दृष्टिकोन विकसित होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. ‘लोकसत्ता’ने ‘लोकांकिका’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याचा स्पर्धक संघांनी पुरेपूर वापर करावा.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.