19 September 2020

News Flash

प्रमाण भाषेसह बोली भाषाही महत्त्वाची!

भाषेला आपण पारखे झाल्याने कोणत्याही विषयाची मांडणी करताना अडचणी येतात.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर, वनाधिपती विनायकदादा पाटील, वैशाली शेंडे, ‘लोकसत्ता’ नाशिकचे प्रमुख वितरक देवदत्त जोशी.  

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेत मान्यवरांचे मत

वक्तृत्व ही कला असून ती आत्मसात करता यायला हवी. वक्त्याने प्रमाण भाषेचा आग्रह धरायला हरकत नाही, पण या प्रमाण भाषेमुळे आपण बोलीभाषेपासून तुटतोय. त्या भाषेला आपण पारखे झाल्याने कोणत्याही विषयाची मांडणी करताना अडचणी येतात. त्या विषयाचा इतिहास, भूगोल सद्य:स्थिती मांडता आली पाहिजे. त्याला विषयाच्या दोन्ही बाजूंचा विचार करता आला पाहिजे. यासाठी संस्काराने जी भाषा तुमच्यापर्यंत आली, तिचा आधी विचार करा, ती तुमची खास ‘शैली’ असू शकते असे मत मान्यवर परीक्षकांनी नोंदविले. निमित्त होते, ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीचे.

वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा पॉवर्ड बॉय बँक ऑफ महाराष्ट्र, दी विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे, डॉ. मिरजगावकर्स आयसीडी औरंगाबाद, एमआयटी औरंगाबाद यांच्या सहकार्याने होत आहे. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात मंगळवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ही फेरी पार पडली. विशेष निमंत्रित परीक्षक तथा ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर व वैशाली शेंडे, वनाधिपती विनायक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाद्वारे स्पर्धेला सुरुवात झाली. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नायगावकर यांनी तरुणपणी आम्ही अनेक दिग्गजांची भाषणे ऐकल्याचे नमूद करत त्या त्या वक्त्यांची शैली कथन केली. सध्या प्रमाण भाषेचा आग्रह होत असल्याने बोली भाषेतील काही शब्द हरविले आहेत. बोलीभाषेचा वापर करणाऱ्यांशी आपली नाळ तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पर्धेसाठी दिलेले काही विषय गंभीर होते. पण काही विषयांच्या बाबतीत तो विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडता आला असता. वातावरण हलके फुलके होत असताना वक्ता आपल्या सोबत श्रोत्याला घेऊन जातो. श्रोत्याची व वक्त्यांची तंद्री लागते. मी-तू पणाची बोळवण कलाप्रांतात होणे गरजेचे आहे. तेव्हाच ती कला आत्मसात होईल असा सल्ला नायगांवकर यांनी दिला.

स्पर्धकांची तयारी पाहून थक्क व्हायला होते. त्यांनी केलेली विषयांची मांडणी, शोधलेले मुद्दे हे युवकांवर होणाऱ्या बेजबाबदार, बेफाम अशा आरोपांचे खंडन करणारे होते असेही ते म्हणाले.

शेंडे यांनी स्पर्धकांना वाचनावर भर देण्याचा सल्ला दिला. विषयांची तयारी करताना त्या विषयाच्या सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. विषय विविधांगी होते. विभागीय स्पर्धेच्या गुणवत्तेसाठी साजेशी मांडणी करण्याचा प्रयत्न काही मोजक्या स्पर्धकांनी केला. आयसिसवर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. विजेते निवडताना आमची कसोटी लागली. विषयाचा सखोल विचार, मांडणी आणि अचूक देहबोलीचा अभ्यास स्पर्धकांना गरजेचा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विनायक पाटील यांनी कान टोचत स्पर्धकांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले. आपला विषय आपल्याला मांडता आला पाहिजे.

आपले माध्यम काय ते प्रत्येकाने ओळखणे गरजेचे असून वक्तृत्व हे साध्य नसून साधन आहे. ते चरितार्थाचे साधन होऊ शकत नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. ही कला आत्मसात करताना वक्ता काय मांडतोय, विषयाची मांडणी कशी करतोय याकडे श्रोता लक्ष देत असतो.

‘लोकसत्ता’ने दिलेली ही संधी म्हणजे ‘शब्दांची व्यायामशाळा’ आहे. शब्दाचे शस्त्र कसे वापरायचे हे येथे सांगितले जाते. यामधून वक्त्याला योग्य ठिकाणी थांबता आले पाहिजे ही समज येईल. जेणेकरून वक्ता का थांबला ही हुरहुर श्रोत्याला वाटेल.

शब्दांचा पट वक्त्याला अचूक खेळता येण्यासाठी त्याला शब्दाच्या चाली समजायला हव्यात, असे पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:35 am

Web Title: loksatta vaktrutva spardha 6
Next Stories
1 अर्ज माघारीसाठी विनवणी, दमदाटी
2 प्रचारासाठी व्यावसायिक गट सक्रिय
3 अल्प भत्त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
Just Now!
X