‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ची विभागीय प्राथमिक फेरी

वक्तृत्व ही कला असून तिची साधना गरजेची आहे. त्यासाठी वाचन, सराव आणि देहबोली याचा अभ्यास गरजेचा ठरतो. यासाठी कोणावर विसंबुन राहण्यापेक्षा स्पर्धकाने स्वतची संहिता स्वत तयार करणे गरजेचे आहे. या माध्यमातून त्यांची वैचारिक जडणघडण होईल असे मत परीक्षकांनी नोंदविले. तर स्पर्धकांनी परीक्षकांनी केलेल्या सुचनांचा विचार करत त्यांना अपेक्षित बदल व्हावे यासाठी प्रयत्न होतील असे आश्वासन दिले. निमित्त होते, ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीचे. लोकसत्ता आयोजित ही स्पर्धा ‘विणा वर्ल्ड’, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को. ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ यांच्या सहकार्याने होत आहे. प्राथमिक फेरीत परीक्षक आणि स्पर्धक यांनी स्पर्धेविषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात..

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
IGI Aviation Bharti 2024
१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! IGI एव्हिएशनकडून १०७४ जागांसाठी भरती, एवढा मिळणार पगार

स्वतची संहिता स्वत तयार करावी..

स्पर्धेसाठी दिलेले विषय उत्तम आणि विचारप्रवृत्त करणारे होते. मोजक्या स्पर्धकांनी विचारपूर्वक मते मांडली. इतर काही स्पर्धक मनोरंजन करण्यासाठी आले होते असे काहीसे चित्र निर्माण झाले. वाचन नसेल तर स्वतची मते चाचपुन कशी पाहणार ? वक्तृत्व कलेची साधना ही विजेसारखी असते. तिची साधना करतांना आपली क्षमता आहे की नाही हे तपासा. नसेल तर स्वतवर काम करा. एकच संहिता सर्व स्पर्धासाठी चालवू नका. व्यक्त होतांना भावनिक असले पाहिजे, पण भावनांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. साहित्यात जुने संदर्भ येतात, पण समकालीन गेले कुठे?  एक उत्तम वक्ता होण्यासाठी जीवतोड मेहनत करून पहा, बोलण्याचा वेग सांभाळा, जिंकण्याची जिद्द बाळगा पण त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा.

वैशाली शेंडे 

विद्यार्थ्यांचे वाचन कमी पडते

स्पर्धकांची तयारी असली तरी त्यांचे विविध विषयांवरील वाचन कमी पडत आहे. या शिवाय भाषेतील शुध्दतेबाबत मुले कमालीची अनभिज्ञ आहेत. विषयाचे गांभीर्य व्यापकता तसेच त्या त्या विषयाची खोलता मुलांपर्यंत पोहचली नाही. वक्तृत्व म्हणजे अभिनय नाही ते मूलभूत कौशल्य आहे. विषयाचे गांभीर्य, गाभा विकसीत होण्यासाठी वाचन गरजेचे आहे. यासाठी भाषा, शैली यावर काम होणे गरजेचे आहे अनेक स्पर्धक हे केवळ त्या विषयाभोवती फेरफटका मारत आल्याचे वाटते.

प्रा. मेधा सायखेडकर 

परीक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे

दै. ‘लोकसत्ता’ने तरूणांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे नक्कीच अभिनंदनीय आहे. स्पर्धेसाठी दिलेले विषय महत्वाचे असून यावर चर्चा घडावी असे आहे. विशेषत तरूणांच्या मनाला भिडणारे हे विषय आहेत. स्पर्धेचे नियोजन, आयोजन सर्वोत्तम आहे. मात्र स्पर्धक म्हणून स्पर्धा झाल्यानंतर परीक्षक प्रत्येकाला वैयक्तीक मार्गदर्शन करतात हे स्पर्धेचे वेगळेपण वाटते. यातुन आम्हाला चुका समजताच आणि पुढील स्पर्धेआधीच त्या दुरूस्त करण्याची संधी मिळते.

श्वेता भामरे (केटीएचएम महाविद्यालय, नाशिक)

स्पर्धा स्फुर्ती देणारी

गेल्या वर्षांपासून मी स्पर्धेत सहभाग घेत आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे दुसरे वर्ष असले तरी स्पर्धेने मला खुप काही दिले आहे. काही तरी नवीन विषय या ठिकाणी हाताळायला मिळतात. त्यासाठी वाचन करावे लागते, ग्रंथालयाच्या आवारात बैठक मारावी लागते, शिक्षकांचे मार्गदर्शन, नवमाध्यमांची स्वैर सफर असे विविध मार्ग हाताळत संहिता तयार होते. यातील एक प्रकारची उत्सुकता मी अनुभवतो याचा आनंद आहे. या शिवाय स्पर्धकांना परीक्षकांचे मिळणारे मार्गदर्शन मला महत्वाचे वाटते.

विशाल मर्ढेकर (मविप्र समाज, कॉलेज ऑफ फार्मसी)

युवा वर्गासाठी मार्गदर्शक उपक्रम

महाराष्ट्राला वक्तृत्वाची एक चांगली परंपरा आहे. अनेक वक्ते या कलेने आपल्याला दिले आहे. स्पर्धेने युवा वर्गाला चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. ग्रामीण विशेष आदिवासी भागातील विद्यार्थी त्यात सहभाग घेत आहे हे महत्वाचे आहे.स्पर्धकांची तयारी चांगली पण अभ्यास कमी पडतो. माझे खाद्यजीवन या विषयावर कोणीच बोलले नाही. हा विषय चांगल्या पध्दतीने मांडता आला असता. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे अवलोकन केल्यानंतर त्यांचे भाषेवरील प्रभुत्व, विषयाची मांडणी, सादरीकरण, उदाहरणे देण्याच्या पध्दती उल्लेखनिय आहेत.

प्रा. देविदास गिरी 

वक्तृत्वाच्या भवितव्याबद्दल चिंतेचे कारण नाही

मराठी भाषा वृध्दिसाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण दोन्ही भागातील विद्यार्थ्यांची तयारी पाहून आनंद वाटला. वक्तृत्वाच्या भवितव्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही, कारण स्पर्धेतील हेच स्पर्धक भावी काळात उत्तम वक्ते होतील, हा विश्वास आहे. मात्र स्पर्धकांना भाषा शास्त्र, व्याकरणाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. वाचन गरजेचे आहे काहीही वाचा पण जे साहित्यिक सर्वमान्य आहेत असे ईरावती कर्वे, नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत यांचे साहित्य अवश्य वाचा. देहबोली ही वक्तृत्वाचा भाग असली तरी परीक्षकांचे किंवा वक्त्याचे लक्ष हे आशय व शैलीवर असते.

प्रा. उध्दव अष्टुरकर 

विषयात वैविध्यपण

स्पर्धेचे विषय विचार करण्यास भाग पाडणारे आणि वैचारिक पातळीच्या सीमा वाढवण्यासाठी अनुकूल आहेत. तरूणमनात विचारांचे काहूर माजवणाऱ्या विषयावर त्याचे मत व्यक्त करण्याकरीता व्यासपीठ दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार

प्रसन्न बच्छाव (म. स. गा. महाविद्यालय, मालेगाव)

शिकवण देणारे व्यासपीठ

स्पर्धा अगदी छान होत आहे. नवे नवे विचार समोर येतात. काहीतरी नव्याने शिकायला मिळत आहे. एक वक्ता म्हणून मला अजून काय करता येईल याची शिकवण हे व्यासपीठ देते. विषयातील नाविन्यता हे स्पर्धेचे बलस्थान असले तरी त्या त्या विषयावर व्यक्त होतांना स्पर्धकांचा कस लागतो. वक्ता म्हणजे अखंड बडबड नसून विषयाची मुद्देसुद मांडणी करणारा दुवा हे व्यासपीठाने मला समजावून सांगितले.

आदिती भारती (लासलगांव महाविद्यालय)