१० वीच्या परीक्षेत गुण देण्याची मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सोमवारी घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या चुकांकडे अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांंना चुकीच्या प्रश्नांचे गुण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इंग्रजी प्रश्नपत्रिकेत तीन प्रमुख चुका झाल्याचे अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे म्हणणे आहे. त्यातील किमान दोन चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्यावेच लागतील, अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे.

प्रश्न क्रमांक चार अ मध्ये ‘जयपूर वॉज फाऊंडेड बाय सवाई जयसिंघ’ या वाक्यात क्रियापद ओळखण्यास सांगण्यात आले होते. अचूक उत्तर पर्याय ‘सवाई जयसिंघ फाऊंडेड जयपूर’ असे हवे होते. मात्र ‘फाऊंड’ हे क्रियापदाचे मूळ रुप दिले असून ते चुकीचे आहे. ही छापील चूक नसून प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी ‘फाईंड’ चे भूतकाळी रुप वापरले आहे.

प्रश्न क्रमांक  एक ब आणि एक अ मध्ये अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करण्यासाठी दिलेल्या वाक्यात ‘टु बी नो अ‍ॅज’च्या ऐवजी ‘टु बी नोन अ‍ॅज’ द्यायला हवे होते. बी च्या पुढे चालु भूतकाळ घ्यायला हवे होते.  दिलेले वाक्य त्या रचनेत वापरता येणे शक्य नाही. तिसरी चूक म्हणजे प्रश्न पाच ब एक मध्ये ‘ प्रिपेअर अ डायलॉग फॉर्म जमबल्ड ऑर्डर’च्या दुसऱ्या विधानात आहे.  यामध्ये ‘रोहित शर्मा हिट्स द सेन्च्युरी’ असे दिले आहे. मात्र दिलेल्या संवादातील तिसऱ्या विधानाचा दिलेला काळ पाहता त्या वाक्यात ‘रोहित शर्मा हिट द सेन्च्युरी’ असे द्यायला हवे होते. यात क्रियापदाला ‘एस’ प्रत्यय लावायला नको होता.

राज्य पातळीवरच्या त्या त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांच्या पायाभूत ज्ञानाचा अंदाज येतो. त्यांना दिलेली जबाबदारी पाहता विद्यार्थ्यांचे योग्य आणि अचूक मूल्यमापन होईल अशी प्रश्नपत्रिका काढणे अपेक्षित असते. मात्र यंदाची प्रश्नपत्रिका आणि तिची काठिण्य पातळी पाहता ही १० वीची प्रश्नपत्रिका वाटत नाही. संपूर्ण राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेत अशा चुका असाव्यात ही गंभीर आणि लाजिरवाणी बाब असून यासाठी दोषी असणाऱ्या सर्व लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने केली आहे.

संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी

आमच्या शाळा मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मंडळाच्या बाबतीत किरकोळ चुका झाल्यास शाळेकडून दंड आकारणी केली जाते. प्रश्नपत्रिकेत चूक होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत राज्य मंडळ दोषींवर काय कारवाई करणार? मंडळाने शाळांचा मान्यता वर्धित आणि कायम करण्याचा प्रश्न अजून मार्गी लावलेला नाही.

– एस. बी. देशमुख  (सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ)