आमदार हरिभाऊ राठोड यांची माहिती
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे एकूण लोकसंख्येप्रमाणे भटके विमुक्त, मागासवर्गीय आणि ओबीसी या घटकांना २७ टक्के आरक्षण करण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली येथे २७ मार्च रोजी दुपारी दोन वाजता महारॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आ. हरिभाऊ राठोड यांनी दिली.
मागील २० वर्षांंपासून भटके विमुक्त आणि बारा बलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप भटके विमुक्त, बाला बलुतेदारांसाठी कोणतेही पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे देशातील ४० कोटींहून अधिक भटके विमुक्त आणि बारा बलुतेदार आज देखील विकासाच्या मुख्य प्रवाहापासुन वंचित आहेत. भटक्या विमुक्तांसाठी लढा देत असतांनाच केंद्रात ओबीसीचे विभाजन करावे आणि राज्यातही त्याच धर्तीवर विभाजन करावे ही मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या बाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के आरक्षण देण्यात यावे. या आरक्षणाचे भटके विमुक्त, अती मागास, मागासवर्गीय या तीन टप्पात वर्गीकरण होणार आहे. यामुळे ओबीसी विभाजनातून बंजारा, धनगर, तेली, माळी, बेलदार, गवळी, न्हावी, कोळी, वंजारी, खातीवाडी, भोई, सुतार, लोहार, धोबी या समाजाला आरक्षणाचा फायदा होईल, याकडे राठोड यांनी लक्ष वेधले. मागणीनुसार विभाजन झाल्यास स्वतंत्र निधी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वतंत्र तीन महामंडळ स्थापन करण्यात यावे, देशभर केंद्रांमार्फत आश्रमशाळा व वसतिगृहांची उभारणी करावी, आदी मागण्या करण्यात येणार आहे. इतका मोठा समूह असूनही खंबीर नेतृत्व लाभले नसल्याची खंत राठोड यांनी व्यक्त केली. नव्या नेतृत्वाला या माध्यमातून संधी मिळणार आहे.