शिवसेनेचा काँग्रेस, मनसेवर ठपका

 

महापालिकेच्या राजकारणात महाआघाडीचा प्रयोग फसण्यास काँग्रेसचे दुटप्पी धोरण आणि मनसेची कार्यशैली कारणीभूत ठरल्याचा ठपका शिवसेनेने ठेवला आहे. काँग्रेसने एकाच वेळी सेना आणि भाजपशी वाटाघाटी केल्या. भाजप आणि पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर आगपाखड करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने पक्षादेशाद्वारे आपल्या नगरसेवकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्याकडे सेनेने लक्ष वेधले आहे.

महापालिकेत भाजपचे ६५, शिवसेनेचे ३४, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच आणि अपक्ष तीन असे संख्याबळ आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी सेनेने पुढाकार घेतला होता. त्यास भाजपमधून सेनेत आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून रसदही मिळाली.

सानप समर्थक मानल्या जाणाऱ्या नऊ ते १० नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले. भाजपच्या सहलीत सहभागी न होता हे नगरसेवक सेनेच्या गोटात दाखल झाले. भाजपला खिंडार पडल्याने सेनेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या मदतीने भाजपकडून सत्ता खेचून घेण्याची जय्यत तयारी झाल्याचा दावा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केला होता.  त्याला काँग्रेस आणि मनसे जबाबदार असल्याचा ठपका सेनेकडून ठेवला जात आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. गणित बिघडल्याने शिवसेनेच्या उमेदवारांना ऐन वेळी माघार घ्यावी लागली.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी वरिष्ठांकडून निवडणूक बिनविरोध होत असेल तर केली जावी, असा आदेश आल्याचे सांगितले. काही वर्षांपासून भाजपमध्ये नव्या लोकांना संधी दिली जाते. जुन्या लोकांना संधी दिली जात नाही. यामुळे भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात बंडखोरी झाली होती. शिवसेनेने चुरस निर्माण केल्यामुळे भाजपला निष्ठावंताला तिकीट देणे भाग पडले. काँग्रेस आणि मनसेमुळे महाआघाडीचा प्रयोग फसला. राज ठाकरे हे पंतप्रधान आणि भाजपवर कायम टीकास्त्र सोडतात. त्यांच्या मनसेने निवडणुकीत मात्र भाजपला मतदान करण्याचा पक्षादेश काढला.  एकाच वेळी त्यांच्यामार्फत सेना आणि भाजपशी वाटाघाटी करण्यात आल्याकडे बोरस्ते यांनी लक्ष वेधले.

सेनेला जाऊन मिळालेले आणि मतदानाआधी स्वगृही परतलेल्या नगरसेवकांनी भाजपने निष्ठावंताला तिकीट दिल्यामुळे आम्ही स्वगृही परतल्याचे नमूद केले. राष्ट्रवादी सेना उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचे गटनेते गजानन शेलार यांनी म्हटले होते. काँग्रेसची भूमिका मात्र वेगळी होती. राज्याप्रमाणे महापालिकेतही आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचे असल्याचे शाहू खैरे यांनी मतदानाला जाताना म्हटले होते. सेनेचा आक्षेप त्यांनी फेटाळून लावला. जादुई आकडा गाठण्यात सेनेला अपयश आल्यामुळे ते हे खापर काँग्रेसवर फोडत असल्याचे खैरे यांनी सांगितले.  मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी शिवसेनेचा सत्तेचा घोळ सर्वज्ञात असल्याचे  नमूद केले. काँग्रेसही सेनेबरोबर नव्हती. मनसेने  कोणताही पक्षादेश बजावला नव्हता, असे म्हटले.