राज्य निवडणूक आयुक्तांची ग्वाही; ६५ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद

निवडणूक आयोगाने काही सकारात्मक बदल केले आहेत. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील त्यांचे शिक्षण, स्थावर व जंगम मालमत्ता, दायित्वे, दोन वर्षे किंवा अधिक शिक्षा होऊ शकेल, असे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, एक वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली असल्यास अशा प्रकरणांची माहिती संक्षिप्त स्वरूपात प्रसारमाध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सहारिया यांनी मुक्त विद्यापीठाच्या दृक्श्राव्य केंद्रातील स्टुडिओतून विविध जिल्ह्य़ांतील ६५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी शासकीय व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक पार पडली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, वस्तू, मद्य यांचा उपयोग होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली.

अशा वेळी उमेदवार नव्या क्लृप्त्या उपयोगात आणण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदानाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्याकरिता बँकांमार्फत लघुसंदेश पाठविण्याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

नवमतदार बदलांचे अग्रदूत

दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत २०० गुन्हेगारी व्यक्तींची तडिपारी, २६ कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत करणे आणि १० कोटींचे मद्य जप्त करण्याची कार्यवाही केली गेल्याचे सहारिया यांनी सांगितले. लोकशाही बळकट होण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता येणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी नवमतदार हे यासाठी होत असलेल्या बदलांचे अग्रदूत असून ते या प्रक्रियेत मोठय़ा संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.