घराची झडती; मात्र प्रिती नागरे फरार; पोलिसांकडून शोध सुरू

बनावट नोटा छापल्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबू नागरे याचे प्रकरण ताजे असताना त्याच्या पत्नीविरुद्ध खंडणीचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर प्रीती नागरे फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

सूक्ष्म वित्तीय संस्थांच्या सावकारी वसुलीचा कर्जदार महिलांना जाच सहन करावा लागत आहे. हा मुद्दा चर्चेत असताना अशाच एका संस्थेची व्यवस्थापक प्रीती नागरे हिच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.

विशाल सुरेश दिंडे (३२, रा. गंजमाळ) यांनी वित्तीय संस्थेकडून एक लाख ८७ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील एक लाखाची परतफेड केली; परंतु उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी नागरे हिने दिंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली.

तसेच जिवे मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार दिंडे यांनी दिली आहे. या प्रकरणी नागरेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनाक्रमाची माहिती समजल्यानंतर प्रीती नागरे गायब आहे. पोलिसांनी शुक्रवारी नागरेच्या घराची झाडाझडती घेत काही साहित्य जप्त केले. याशिवाय नागरे व दिंडे यांच्यात झालेल्या संवादाची ध्वनिफीत पोलिसांकडे आहे. पोलीस तिचा शोध घेत असल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.