X
X

सरकारी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘मेस्टा’ प्रयत्न करणार

माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासक्रम तयार करत ‘मेस्टा टॅलेंट हंट’ परीक्षा घेण्यात येणार आहे.

आगामी काळात विद्यार्थी केंद्रबिंदू मानत ‘मेस्टा टॅलेंट हंट’ परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) घेतला असल्याची माहिती अध्यक्ष संजयराव तायडे यांनी दिली.

मेस्टाच्या वतीने आजवर संघटना स्थापनेपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्या, अडचणीकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. या एकजुटीमुळे संस्थाचालक आजपर्यंत बिगर घरगुती किंवा वाणिज्यिक दराने वीजदेयक भरत होते. ते आता सार्वजनिक सेवा (ब) या दराने भरावे, असा आदेश हिवाळी अधिवेशनात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अन्य काही प्रलंबित मागण्यांबाबत शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याची माहिती तायडे यांनी दिली. पुढील काळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत पालक, शिक्षक, स्कुल बस चालक व मालक यांना सोबत घेऊन प्रशिक्षण शिबीर, शिक्षक प्रशिक्षण, पालकांचे जनजागृती शिबीर तसेच संस्था चालकांसाठी कार्यालयीन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर होण्यासाठी पूर्व प्राथमिक ते माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासक्रम तयार करत ‘मेस्टा टॅलेंट हंट’ परीक्षा घेण्यात येणार आहे. यातून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय, जिल्हा परिषदेची एक शाळा दत्तक घेऊन तिचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करून आयएसओ मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरविण्यात आले.

विशेषत जिल्हा परिषदेची जी शाळा प्रशासनाला चालविणे डोईजड होत आहे. ती मेस्टा दत्तक घेईल. त्या शाळेची डागडुजी, स्वच्छता, तिची शैक्षणिक गुणवत्ता या सर्वावर मेस्टा काम करणार आहे. या संदर्भात राज्य शासन तसेच शिक्षणमंत्र्यांना प्रस्ताव पाठविला असून तिला आगामी शैक्षणिक वर्षांत मूर्त रूप येण्यास सुरुवात होईल, असेही तायडे यांनी सांगितले.

21
Just Now!
X