News Flash

शेतकरी संपासाठी जनजागृती

जिल्हय़ात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

पिंपळगाव बसवंत येथे झालेली शेतकऱ्यांची सभा.

बैठका, फेरी, सभांद्वारे शेतकऱ्यांचा जागर

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू व्हावा, शेतकऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात बुधवारपासून संपाच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू झाली. त्या अनुषंगाने बैठका, फेरी व छोटेखानी सभांद्वारे संपाचा जागर सुरू झाल्याचे चित्र आहे.

जिल्हय़ात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कृषिमालास भाव मिळत नसताना दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे. जिल्हा बँकेतून गरजूंना कर्ज मिळत नाही आणि आहे ते पैसे काढणेही अवघड झाले आहे. नैराश्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. १ जूनपासून म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पूणतांबा येथे मुख्य बैठक झाल्यानंतर संपाच्या तयारीसाठी गावोगावच्या शेतकऱ्यांना संपात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी जिल्हय़ात तालुकानिहाय, गाव पातळीवर बैठका असे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.

सभा, पत्रकांद्वारे आवाहन

गावात संप तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सचित्र माहितीपूर्ण फलक लावण्यात येत आहे. या अंतर्गत बुधवारी सकाळी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत फेरी काढली. संपाबाबतची माहितीपत्रके वितरित करण्यात आली. बागलाण तालुक्यात धांद्री येथे गावाच्या वेशीवर ‘वरुण राजा, बेमुदत संपावर जा’ अशी घोषणा देत शेतकऱ्यांनी भजनाचा कार्यक्रम सुरू करत संपाला पाठिंबा दर्शविला. गिरणारे गावातही संपाबाबत शेतकऱ्यांची सभा पार पडली. त्यात संपकाळात घरावर शेतकरी काळे झेंडे लावणार आहेत, गावागावात पत्रकांचे वितरण केले जाईल. दुचाकीवरून परिसरात फेरी, गाव परिसरात शेतीमाल विक्री पूर्णत: बंद ठेवणे, दूध केवळ रुग्णालय तसेच शाळेला देण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. तसेच संपकाळात लग्न कार्यालयातील हळद, लग्नातील टोपी-फेटय़ांना बंदी घालत साध्या पद्धतीने लग्न व साखरपुडा सोहळा करण्याचा निर्णय झाला. दिंडोरी येथेही सायंकाळी शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

राजकीय मंडळींना दूर ठेवले

आजवरचा अनुभव लक्षात घेत शेतकऱ्यांनी संप आणि त्याचे नियोजन यापासून राजकीय मंडळीना चार हात दूर ठेवले आहे. राजकीय मंडळीकडून शेतकरी आत्महत्येचे केले जाणारे भांडवल, होणारी राजकीय चर्चा यामुळे शेतकऱ्यांनी आपला लढा आपण लढायचा, असा निर्धार करत किसान क्रांती मोर्चाने संपाची हाक दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:21 am

Web Title: maharashtra farmers planning to go on strike from june 1
Next Stories
1 इमारतींवरील झाडांच्या पुनरेपणासाठी ‘ट्री रेस्क्यू’
2 कांदा स्वस्त, व्यापारी मस्त!
3 मनमाड रेल्वे आरक्षण कार्यालयात फिल्मी स्टाइल चोरी
Just Now!
X