आम्हाला घरी खाण्यास किती लागते? शेत जमिनीत माल आम्ही तुमच्यासाठी पिकवतो. याद्वारे आम्ही देशाची सेवा करीत आहोत. कृपया भाव करू नका.. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत आहे. संपूर्ण बाजार समितीत कुठेही कोथिंबिर नाही. असे असूनही आपण सरकारी भावात ६० रुपयाला जुडी देत आहोत.. सलग सात दिवस बाजारात शेतमाल आणू न शकलेले निफाडच्या नैताळ्याचे लक्ष्मण नागरे हे वयोवृद्ध शेतकरी गुरुवारी ग्राहकांच्या गर्दीसमोर अनोख्या पद्धतीने विपणन करत होते. कोणी दोन जुडय़ा १०० रुपयांत म्हणजे प्रत्येकी ५० रुपयांना मागूनही ते बधले नाहीत. कित्येक ग्राहक घासाघीस करून निघून गेले. परंतु, नागरे स्वत: निश्चित केलेल्या ‘सरकारी भावा’वर ठाम राहिले. आपण निश्चित केलेल्या भावात १०० जुडय़ा विकल्यानंतर ते आनंदाने घराकडे मार्गस्थ झाले.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा गुरुवार हा आठवा दिवस. याच दिवशी दुपारी नाशिकमध्ये या प्रश्नावर राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. संपकाळात पुकारलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाचा बुधवार हा अखेरचा दिवस असल्याची माहिती ऐकून आसपासच्या काही गावातील बोटावर मोजता येतील इतके शेतकरी माल घेऊन नाशिक बाजार समितीत दाखल झाले.

बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. परंतु, त्यात अधिक्याने भरेकऱ्यांचा समावेश होता. ही मंडळी थेट शेतातून माल खरेदी करून किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतात. या गर्दीत अपवाद वगळता काही शेतकरी आढळले. नागरे हे त्यापैकीच एक. संपामुळे शहरवासीयांना तुटवडय़ाला तोंड द्यावे लागले, तसेच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. एक बिघा जमिनीत नागरे यांनी वांग्यासोबत मेथीचे आंतरपीक घेतले. संपकाळात मेथी काढणीवर आली. पावसाने ती सडू लागली. मेथी फुलावर आल्याने एकही रुपयाही मिळाला नसल्याची व्यथा नागरे यांनी मांडली. कोथिंबिरीची बाजारापर्यंत वाहतूक करण्यास कोणी तयार नव्हते. फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाला जादा पैसे देऊन आणि गाडीचे काही नुकसान झाल्यास त्याची हमी घेऊन कशीबशी ती या ठिकाणी आणली. बाजारात कोणाकडे कोथिंबिर नाही. आदल्या दिवशी १०० रुपये जुडी दराने विक्री झाल्याचे ऐकले. परंतु, आपण ती किंमत लावली नसल्याचे ते ग्राहकांना समजावत होते.

शहरी ग्राहक नेहमीच्या सवयीप्रमाणे घासाघीस करून काही कमी होतील काय, असा प्रयत्न करीत होते. परंतु, संपामुळे आलेले शहाणपण नागरे यांच्या विपणनात झळकत होते.

काहींना भाव अधिक वाटल्याने त्यांनी खरेदी केली नाही. परंतु, प्रत्येकाला ते ही किंमतच कशी योग्य आहे ते पटवून देत होते. तुम्हीच मालाला योग्य भाव न दिल्यास शेतकरी कर्जबाजारी होईल, याची जाणीव त्यांनी सर्वाना करून दिली. बाजारात कोथिंबिर नसल्याने त्यांच्या १०० जुडय़ा त्यांनी ठरविलेल्या भावातच विक्री केल्या.

शेतकऱ्यांचा शहाणपणा

आडगावचे दत्तू शिंदे हे या दिवशी ढोबळी मिरची घेऊन आले होते. सात दिवसात त्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी संप पुकारूनही जे अपेक्षित होते ते झाले नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया. लाखो रुपयांची गुंतवणूक करून ढोबळी मिरचीची लागवड केली. संप काळात माल बाजारात नेला नव्हता. अखेर किती नुकसान सहन करायचे हा विचार करून ते माल घेऊन आले. त्यांच्याच गावातील अमोल माळोदे मका कणसाच्या जाळ्या घेऊन बाजारात आले. संप काळात सुकणारे कणीस जनावरांना खायला दिले. शेतात दररोज ताजा माल तयार असतो. किती दिवस तो खराब होऊ देणार, हा त्यांचा प्रश्न. आपण निश्चित केलेल्या दरातच मालाची विक्री व्हावी, असा जे मोजके शेतकरी बाजारात होते त्यांचा आग्रह होता. संपानंतर शेतकरी वर्गाच्या बदललेल्या मानसिकतेचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.