महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षान्त सोहळ्यात मुख्यमंत्री
नक्षलवादी व दहशतवादी कारवाया, सायबर क्राईम, सर्वसामान्यांची आर्थिक लुबाडणूक यामुळे गुन्ह्यांचे स्वरूप सातत्याने बदलत आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम होण्यासोबत शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे. त्यासाठी शासन आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. परंतु, या बाबी आहेत किंवा नाही त्याची पर्वा न करता आहे त्या स्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा बुधवारी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्यासह पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित उपस्थित होते. प्रबोधिनीच्या मुख्य कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्यात सरळसेवेद्वारे ५०३ पुरूष आणि २४६ महिला असे एकूण ७४९ प्रशिक्षणार्थी लोकसेवेत रुजू झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशिक्षणार्थीनी घेतलेल्या शपथेचा संदर्भ देऊन या निमित्ताने प्राप्त झालेली शक्ती डोक्यात जाऊ न देण्याचा सल्ला दिला. या शक्तीचा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग करणे आवश्यक आहे. आपण समाजासाठी काम करत असून त्यात पारदर्शकता ठेवावी. पोलीस दलास दैनंदिन गुन्हे व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन याकडे लक्ष द्यावे लागते. सायबर व आर्थिक गुन्हे वाढत असून त्यांचे अन्वेषण करण्यासाठी प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा. शहीद तुकाराम ओंबळे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या शौर्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी नवोदितांवर आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीला गतवर्षी स्वायत्तता देण्यात आली होती. पोलिसांना सवरेत्कृष्ट प्रशिक्षण देणारी ही देशातील संस्था व्हावी यासाठी प्रबोधिनीला शासनाकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रबोधिनीच्या इतिहासात प्रथमच महिला प्रशिक्षणार्थीला सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सर्वोच्च मानाची तलवार देऊन मीना तुपे यांना गौरविण्यात आले. पुरस्कार्थीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक होती. त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्र्यांनी तुपे यांचे कौतुक करतानाच हा नारीशक्तीचा उदय असल्याचे सांगितले.
महिला शक्ती प्रभावीपणे पुढे येत असून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण हातभार लागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रबोधिनीचे संचालक नवल बजाज यांनी प्रबोधिनीला स्वायत्तता मिळाल्याने पोलीस दलासोबत इतर शासकीय विभाग व खासगी संस्थांनाही प्रशिक्षण देण्यासाठी धोरण तयार केले जात असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थीना मूलभूत शिक्षणासोबत सायबर, आर्थिक व दहशतवाद आदी गुन्ह्यांचे अन्वेषण करण्यासाठी प्रशिक्षण दिले गेल्याचे त्यांनी नमूद केले. प्रारंभी शानदार संचलनाने या सोहळ्याची सुरुवात झाली.
प्रशिक्षणार्थीचा गौरव
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीची मानाची तलवार मीना तुपे यांना देण्यात आली. प्रबोधिनीच्या आजवरच्या इतिहासात हा किताब मिळवणाऱ्या तुपे या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी आणि सवरेत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचे सुवर्णपदक व चषकही तुपे यांनी पटकावला. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (द्वितीय) प्रदीप लाड, सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वोत्तम – धनाजी देवकर, ड्रील गटात दीपमाला जाधव, रायफल व रिव्हॉल्वर नेमबाजी प्रशांत मुंडे, कायदा अभ्यास पूनम सूर्यवंशी, अध्ययनात सर्वोत्तम कामगिरी शुभांगी मगदुम यांना विविध चषकांनी गौरविण्यात आले.ू
((( नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षान्त सोहळ्यात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेल्या मीना तुपे यांना मानाची तलवार देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ))
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 4:33 am