दहावीच्या परीक्षेत धुळे जिल्ह्यची सवरेत्कृष्ट कामगिरी

यंदाच्या दहावी परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ८७.४२ टक्के लागला असून  गतवर्षीच्या तुलनेत निकालात १.८५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गतवर्षी नाशिक मंडळाचा ८९.६१ टक्के निकाल होता. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्य़ाचा ८९.७९ टक्के निकाल  लागून विभागात सर्वोत्कृ ष्ट कामगिरी केली आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली.

नाशिक विभागाच्या निकालावर नजर टाकल्यास मुलींचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. यंदा विभागात दोन लाख ०२ हजार ४७८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी एक लाख ७७ हजार ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात नियमित परीक्षार्थीमध्ये ८५.५० टक्के मुले उत्तीर्ण झाली तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६९ टक्के आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. या जिल्ह्य़ाची टक्केवारी ८७.४२ एवढी आहे. विभागात धुळे (८९.७९) पहिल्या स्थानी आहे. पाठोपाठ जळगाव (८७.७८) तर आदिवासीबहुल नंदुरबार (८६.३८) आहे.

नाशिक जिल्ह्य़ात ७९ हजार ७१०, धुळे जिल्ह्य़ात २५ हजार ७९९, जळगावमध्ये ५४ हजार २६७, नंदुरबार १७ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी नाशिक मंडळाचा ८९.६१ टक्के निकाल होता. यंदा त्यात वाढ होण्याऐवजी तो पावणे दोन टक्क्याहून अधिकने कमी झाला. राज्यात नऊ विभागात नाशिक सहाव्या क्रमांकावर आहे.

मंगळवारी दुपारी १ वाजता निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी सकाळपासून संगणकासमोर ठाण मांडले होते. ऑनलाइन निकाल जाहीर झाले. त्याची संगणकीय प्रत विद्यार्थ्यांना मिळाली. परंतु, गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख कधी मिळणार याची स्पष्टता झालेली नाही. ही तारीख अद्याप जाहीर झाली नसल्याचे विभागीय अध्यक्ष रा. वि. गोधने यांनी सांगितले. या वर्षी लोककला आणि चित्रकला या विषयांचे गुण देण्यात आले. नाशिक विभागात हे विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १५ हजार होती.

या वर्षी भाषा विषयास पर्याय म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमातील विषयांचा समावेश अनिवार्य गटात करण्यात आला. त्यातील सहा विषयांत विभागात १७८४ पैकी १७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरम्यान, यंदापासून ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील प्रत काढून अर्ज भरता येईल. गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकीत प्रतीसह १४ जून ते २३ जून २०१७ या कालावधीत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करावा, असे मंडळाने म्हटले आहे. पुनर्पीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठीची परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार असून त्यासाठी  विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील.

विषयवार टक्केवारी

मराठी प्रथम भाषा ८९.८१ टक्के, मराठी द्वितीय / तृतीय भाषा ९७.९५, उर्दू प्रथम भाषा ९३.७७ टक्के, हिंदी प्रथम भाषा ९१.७७, हिंदी द्वितीय / तृतीय भाषा ९१.६६, इंग्रजी प्रथम भाषा ९८.९७, इंग्रजी द्वितीय / तृतीय भाषा ८८.१४, गणित ९०.७८, विज्ञान ९५.९५ आणि सामाजिक शास्त्रे ९६.९९ टक्के असे आहे.

उत्तीर्णतेत प्रथम श्रेणी अव्वल

यंदाच्या निकालात नाशिक विभागात विशेष प्रावीण्यासह ४६८६४ विद्यार्थी तर ६० टक्के व त्याहून अधिक गुण ७७ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी मिळविले. ४५ टक्के व त्यापुढे अर्थात द्वितीय श्रेणीत ४७ हजार २७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण श्रेणीत म्हणजे ३५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५९८६ आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम नाही

शाळांकडून आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्या दुरुस्त करून पुन्हा मागविल्या. त्यात काही अवधी गेला. त्यामुळे आठवडाभर उशिराने निकाल जाहीर झाला. गुणपत्रिका छपाई व तत्सम काम प्रगतिपथावर आहे. या कारणास्तव अद्याप मूळ गुणपत्रिका कधी मिळणार त्याची तारीख जाहीर झालेली नाही. अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका आवश्यक ठरते. तत्पूर्वी, ही गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडेल, असे शिक्षण मंडळ विभागीय अध्यक्ष रा.वि.गोधने यांनी सांगितले आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेवर गुणपत्रिका विलंबाने मिळाल्याचा अकरावी प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

कॉपीप्रकरणी १९२ विद्यार्थ्यांना शिक्षा

माध्यमिक शालान्त परीक्षेत एकूण १९३ विद्यार्थ्यांना गैरमार्गप्रकरणी शिक्षा करण्यात आली. त्यामध्ये नाशिकचे ४२, धुळे ४१, जळगाव ५० तर नंदुरबारच्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी मंडळाने ४१७ पैकी १४८ केंद्रांवर छायाचित्रण करून नजर ठेवली होती. यामुळे परीक्षेतील गैरप्रकार कमी झाल्याचा दावा विभागीय सचिवांनी केला. मागील वर्षी कॉपी प्रकरणात १९७ विद्यार्थ्यांना शिक्षा झाली होती. यंदा हे प्रकरण कमी करण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले.

निकालातील चढ-उतार नेहमीचाच

गतवर्षीच्या तुलनेत नाशिकचा निकाल १.८५ घसरला असला तरी कॉपीची प्रकरणे कमी झाली हे लक्षात घ्यायला हवे. निकालात दरवर्षी चढ-उतार होत असतात. सातत्याने त्यात वाढ झाली पाहिजे असे नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. त्यांची क्षमता व पातळी एकसमान असेल असे घडत नाही. गतवर्षीच्या तुलनेत कॉपीची प्रकरणे कमी करण्यात मंडळाला यश आले.

-रा. वि. गोधने, विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ