एरवी एसटी बसचा प्रवास म्हटला की, धक्काबुक्की.. वाहकाची सुटय़ा पैशांसाठी प्रवाशांवर होणारी आरडाओरड.. प्रवासात अचानक ब्रेक दाबल्याने होणारा गोंधळ.. रोजच्या या वातावरणाला सरावलेल्या प्रवाशांना बुधवारी सुखद धक्का बसला. निमित्त होते, राज्य परिवहन महामंडळाच्या ६८ व्या वर्धापनदिनाचे. प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले गेले. वाहक व चालकही प्रवाशांशी आदबशीरपणे वागत होते. प्रवाशांना रोजचा प्रवास सुखद व्हावा यासाठी या दिवशी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल महामंडळाने केली. तथापि, हा सुखद धक्का पचनी न पडल्याने प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही अशी खंत विभाग नियंत्रकांनी व्यक्त केली.

दैनंदिन आयुष्यात विद्यार्थी, नोकरदार यासह अनेकांना बसचा प्रवास हा नित्याचा भाग आहे. त्यावेळी बसमधील गर्दी, जुनाट गाडय़ांचा खडखडाट, कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, बसमध्ये ठिकठिकाणी रंगलेल्या जागा यासह कचरा हे सर्व वातावरण प्रवाशांना सरावाचे झाले आहे. त्याबद्दल काही अपवाद वगळता अन्य प्रवाशांना खेद ना खंत. परंतु, बुधवारी एसटी महामंडळाने वर्धापन दिनाचे औचित्य साधत हे चित्र बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला. शहर परिसरातील जुने मध्यवर्ती बस स्थानक, मेळा, ठक्कर बाजार, महामार्ग आणि त्र्यंबकेश्वर या पाच स्थानकांत प्रवाशांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. बस स्थानकांवर ध्वनिक्षेपकावरून बसविषयी उद्घोषणा तशी नेहेमीचीच. आज तिला साथ लाभली ती सनईच्या मंजूळ स्वरांची. बस स्थानक परिसर कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेत स्वच्छ केला. सकाळी बस चालक आणि वाहकांना प्रवाशांशी सौजन्यपूर्वक वागण्याची शपथ देण्यात आली. यावेळी परिवहन महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसह २१ योजनांची माहिती देणारे माहिती पत्रके देण्यात आली. कोणत्या योजनेचा कसा लाभ घेता येईल, कोठे संपर्क करता येईल या विषयी माहितीही देण्यात आली. यासाठी आकर्षक सवलती काय आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

स्थानकावरील या बदलामुळे नेहमीप्रमाणे बस पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना आपण नक्की कुठे आलो याची क्षणभर साशंकता मनात डोकावली. बसमध्ये स्थानापन्न झालेल्यांचे वाहक, चालक व आगार प्रमुखांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थानकाचा परिसरातील स्वच्छतेने प्रवाशांना समाधान वाटले.

काहींनी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर वर्धापन दिन कार्यक्रमाचे औचित्य असल्याचे लक्षात आले. या दिवशी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करत त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. दुपारच्या सत्रात विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या उपस्थितीत पाच वाहक, पाच चालक आणि चार यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुनील पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक बद्री राठोड आदी उपस्थित होते.

दरम्यान, परिवहन महामंडळाने आपला साचेबध्द कारभार मोडीत काढत सौजन्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु, प्रवासी वर्गाकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. प्रवाशांनी या उपक्रमांबाबत उत्स्फुर्तता व्यक्त केली नाही किंवा त्याबाबत आपली प्रतिक्रियाही नोंदवली नसल्याची खंत जोशी यांनी व्यक्त केली.