परीक्षेशी संबंधित कामे रखडल्याने कारवाईची तयारी

कोणत्याही शाळा-महाविद्यालयांत ज्ञानदान हेच खरे तर शिक्षकांचे काम. त्याअंतर्गत नियमित ज्ञानदान जसे येते, तसेच परीक्षेशी संबंधित कामांचाही अंतर्भाव होतो. ज्ञानदान करणाऱ्या या शिक्षकांनी परीक्षेशी संबंधित कामे करण्यास हात आखडता घेतल्यास जी काही बिकट स्थिती निर्माण होईल, त्याची अनुभूती सध्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ घेत आहे. अनेक अध्यापक प्रश्नसंच निर्मिती, परिनिरीक्षण, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेशी संबंधित कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याने या कामात अडथळे निर्माण होऊन ती वेळेवर पूर्ण करणे अवघड झाले आहे. यामुळे त्रस्तावलेल्या विद्यापीठाने आता अशा निष्क्रिय अध्यापकांविरुद्ध कारवाई करण्यासोबत त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेवेळी ‘परीक्षक’ म्हणून डच्चू देण्याचे निश्चित केले आहे.

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या आरोग्य विद्यापीठाशी संलग्न वेगवेगळ्या पाच विद्याशाखेची एकूण ३२६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या ठिकाणी दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. हिवाळी व उन्हाळी याप्रमाणे विद्यापीठ वर्षांतून दोन वेळा लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेत असते. कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतील काही अध्यापकांच्या कार्यशैलीमुळे विद्यापीठाला या निकषाचे पालन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली. वास्तविक, विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नित महाविद्यालयातील अध्यापकांना विद्यापीठ परीक्षेचे व विद्यापीठाचे इतर कामकाज करणे बंधनकारक आहे. परीक्षेचे कामकाज करणे ही तर त्यांची जबाबदारी व कर्तव्याचा भाग आहे. तरीदेखील अनेक अध्यापक त्यासाठी येत नाहीत अथवा टाळाटाळ करत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संदर्भात राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठवत जे अध्यापक प्रश्नसंच निर्मिती, परिनिरीक्षणाचे काम करत नाहीत, तसेच जे उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करत नाहीत, त्यांची यादी तयार करून विद्यापीठास सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अशा अध्यापकांना प्रात्यक्षिक परीक्षकांच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. त्यांना प्रात्यक्षिक परीक्षक म्हणून नियुक्ती देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

केवळ नियमित काम करणाऱ्यांना संधी

एकिकडे कामे टाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताना आरोग्य विद्यापीठाने ही कामे नियमितपणे करणाऱ्या अध्यापकांना इतरत्र संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन, प्रश्नसंच निर्मिती, परीनिरीक्षण ही कामे जे अध्यापक करतात, केवळ त्यांनाच प्रात्यक्षिक परीक्षांचे परीक्षक म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

अध्यापक मान्यता रद्द करण्याची तयारी

परीक्षेशी संबंधित कामास टाळाटाळ करणाऱ्या अध्यापकांची यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना विद्यापीठ अध्यापक मान्यता का रद्द करू नये, म्हणून नोटीस बजावत १५ दिवसात खुलासा मागवणार आहे. खुलासा असमाधानकारक असल्यास विद्यापीठाचे कामकाज कर्तव्याचा भाग असताना केले नाही, म्हणून संबंधितांच्या गोपनीय अहवालात नोंद केली जाईल.