आरोग्य विद्यापीठाचा अजब निर्णय

एकाच प्रश्नपत्रिकेत दोन विषयांचे दोन गट. त्यांची उत्तरे लिहायची असतात ती दोन स्वतंत्र उत्तरपत्रिकांमध्ये. परंतु अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या गटातील प्रश्न कोणत्या उत्तरपत्रिकेत लिहायचा हेच समजत नाही. गोंधळ उडतो त्यांचा. मग त्यांचे गुण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अखेर निर्णय घेण्यात आला, की त्यांनी एकाच उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहावे. म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही. ना विद्यार्थ्यांना, ना पेपर तपासणाऱ्यांना. यात विशेष आहे ती एकच गोष्ट. ती म्हणजे हे कुठल्या बालवाडीतील वा शाळेतील विद्यार्थी नसून, ते आहेत पदव्युत्तर समचिकित्सा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी. आणि त्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी नियम बदल करणारे विद्यापीठ आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.

पदव्युत्तर समचिकित्सा अभ्यासक्रमातील ‘रिसर्च मेथडॉलॉजी, बायो स्टॅटेटिक्स’ आणि ‘हिस्ट्री ऑफ मेडिसीन’ या विषयाच्या लेखी परीक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी २०१७ परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ‘अ’ आणि ‘ब’ गटातील विषयाच्या प्रश्नपत्रिका एकाच उत्तरपत्रिकेवर सोडविण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयाची कारण िममासा करताना उपरोक्त विषयाच्या प्रश्नपत्रिका आधी ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात लिहिल्या जात असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांकडून अनेकदा अनावधानाने ‘अ’ गटाची उत्तरे ‘ब’ गटात तर ‘ब’ गटाची उत्तरे ‘अ’ गटाच्या उत्तरपत्रिकेत लिहिली जात होती, याकडे लक्ष वेधण्यात आले. चुकीने वेगळ्याच गटातील उत्तरपत्रिकेत लिहिल्याने विद्यार्थ्यांना गुण  कमी होण्याची धास्ती. दुसरीकडे तपासताना प्राध्यापकांचाही गोंधळ उडत असणार. उपरोक्त निर्णय ज्या अभ्यासक्रमासाठी घेतला, तो पदव्युत्तर स्तरावरील आहे. म्हणजे ही परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने वैद्यक शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांच्याकडून अनावधानाने होणाऱ्या चुका टाळण्यासाठी प्राध्यापकांना प्रबोधन करणे अवघड नाही. त्याऐवजी विद्यापीठाने विद्यार्थी पुन्हा अशी चुकच करणार नाही, अशी तजविज केल्याचे दिसून येते.

चुकीचा पायंडा

उपरोक्त दोन्ही विषयांची परीक्षा देणारे परीक्षार्थी एकच आहे काय, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. वास्तविक, पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना को

णत्या विषयाची प्रश्नपत्रिका कोणत्या उत्तरपत्रिकेत सोडवायची याचे किमान ज्ञान असणे अभिप्रेत आहे. संबंधितांकडे ते नसल्यास प्राध्यापकांनी प्रबोधन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची सोय पाहण्यासाठी विद्यापीठाने घेतलेला निर्णय चुकीचा पायंडा पाडणारा ठरू शकतो. वैद्य विजय कुलकर्णी (सदस्य, आरोग्य भारती)

आरोग्य विद्यापीठात प्रत्येक वैद्यक शाखेचे स्वतंत्र अभ्यास मंडळ आहे. वैद्यकीय परिषदेच्या नियमावलीनुसार हे मंडळ प्रत्येक विषयावर चर्चा करून अंतिम निर्णय घेते. उपरोक्त निर्णय घेण्याआधी अभ्यास मंडळाने मंजूर दिल्यानंतर तो अंमलात आला आहे.  डॉ. कालिदास चव्हाण (परीक्षा नियंत्रक)