आरोग्य विद्यापीठाचे फर्मान; भरमसाठ शुल्कामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

मूळ कागदपत्रांच्या दुय्यम प्रती प्राप्त करणे असो, वा कागदपत्रांची पडताळणी करावयाची असो.. अशा कोणत्याही कामांसाठी राज्यातील वैद्यक महाविद्यालये मनमानीपणे शुल्क आकारत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संबंधितांना चाप लावण्यासाठी आता या दस्तावेजांसाठी सर्व मिळून अधिकतम एक हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे. या निर्णयामुळे उपरोक्त कामांसाठी सर्वत्र समान शुल्क राहील. परंतु कागदपत्रांशी निगडित एखाद-दुसरी प्रत हवी असल्यास विद्यार्थ्यांस संपूर्ण शुल्क मोजावे लागू शकते. इतकेच नव्हे, तर कागदपत्रांचे साक्षांकन जे सर्वत्र मोफत करून दिले जाते, त्यापोटी शुल्क आकारणीची मुभा विद्यापीठाने महाविद्यालयांना बहाल केली आहे. यामुळे भरमसाट शुल्क आकारणीविरोधात तक्रारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची हसावे की रडावे, अशी स्थिती झाली आहे.

आरोग्य विद्यापीठाशी संलग्न राज्यात एकूण ३२६ महाविद्यालये असून हजारो विद्यार्थी त्यात शिक्षण घेतात. वैद्यक शाखेचे शिक्षण घेणाऱ्या आणि शिक्षण पूर्ण केलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव मूळ कागदपत्रांच्या दुय्यम प्रती, कागदपत्रे साक्षांकित करून मिळणे, पडताळणी, कागदपत्रांतील नावात दुरुस्ती करणे आदींसाठीचे प्रस्ताव महाविद्यालयांकडून विद्यापीठास सादर केले जातात. अशा प्रस्तावांची महाविद्यालय स्तरावर छाननी होऊन ते विद्यापीठास पाठविले जातात. त्यासाठी महाविद्यालये वेगवेगळी शुल्क आकारणी करीत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. याबद्दल वारंवार तक्रारी होत असल्याने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात आला. उपरोक्त दस्तावेजांसाठी मनमानीपणे आकारण्यात येणाऱ्या शुल्काची तफावत दूर करून सर्व महाविद्यालयांतील शुल्कात समानता आणण्यावर मंथन झाले. अखेर सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रान्सक्रिप्ट (दुय्यम प्रती), अटेस्टेशन (साक्षांकित प्रती), पडताळणी, कागदपत्रांच्या दुय्यम प्रतीकरिता सर्व प्रती मिळून अधिकतम एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व अधिष्ठाता यांना सूचित करण्यात आले. विविध दस्तावेज प्रमाणित करून देण्यासाठी, महाविद्यालयाकडून पाठविण्यात येणाऱ्या ट्रान्सक्रिप्ट व अटेस्टेशन, व्हेरिफिकेशन, कागदपत्रांच्या दुय्यम प्रतींसाठी विद्यार्थ्यांकडून प्रस्तावनिहाय अधिकतम एक हजार रुपये इतकेच शुल्क आकारण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. या संदर्भातील माहिती महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रकांनी केले.

सध्याच्या महागाईच्या काळात वैद्यकीय शिक्षणही आवाक्यात राहिलेले नाही. वैद्यक शाखेच्या शिक्षणासाठी भराव्या लागणाऱ्या भल्या मोठय़ा शुल्काने विद्यार्थी व पर्यायाने पालकांचे कंबरडे मोडले आहे. या स्थितीत मूळ कागदपत्रांच्या दुय्यम प्रती मिळविताना विद्यार्थ्यांवर अधिकचा आर्थिक भार पडणार आहे. त्याअंतर्गत साक्षांकित प्रतींसाठी शुल्क आकारणी होणार असल्याने विद्यार्थीवर्गात अस्वस्थता आहे. कागदपत्रे साक्षांकनासाठी कुठेही शुल्क आकारणी होत नाही. असे असताना विद्यापीठाने त्याचाही शुल्कात अंतर्भाव केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एरवी साक्षांकन मोफत स्वरूपात करून मिळते, पण महाविद्यालयात त्याकरिता पैसे मोजावे लागणार असल्याने तक्रारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘सहन होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी अवस्था झाली आहे.

विद्यापीठही चुकते तेव्हा..

उन्हाळी सत्र २०१७ मधील लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यात पुनर्परीक्षार्थीना परीक्षा अर्ज शुल्क जे २० रुपये आहे ते न भरण्याचे म्हटले होते. हा उल्लेख विद्यापीठाकडून अनवधानाने झाला. वास्तविक, नियमित आणि पुनर्परीक्षार्थी या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जाचे शुल्क भरणे अनिवार्य आहे. आपली चूक लक्षात आल्यावर विद्यापीठाला घाईघाईत लेखी परीक्षेच्या शुल्काबाबतची स्पष्टता करावी लागली.