20 February 2019

News Flash

‘बम बम भोले’नी शिवमंदिरे गजबजली

‘नमामी शंकर शिवा मी शंकर.. बम बम भोले’च्या जयघोषात मंगळवारी जिल्हा परिसरातील शिवमंदिरे गजबजली.

महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

‘नमामी शंकर शिवा मी शंकर.. बम बम भोले’च्या जयघोषात मंगळवारी जिल्हा परिसरातील शिवमंदिरे गजबजली. महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले तरी या उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची किनार लाभल्याचे यावेळी दिसून आले. ‘महावादन’ हा कार्यक्रमही धार्मिक रंगात न्हाऊन निघाला.

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मंदिर परिसरात सोमवारी रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. भाविकांना पूर्व दरवाजातून रांगेत जाऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. स्थानिकांना दुपारी साडेबारापर्यंत पश्चिम दरवाजाने प्रवेश देण्यात आला. यासाठी ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली. पहाटे महापूजा करण्यात आली. पंचामृत, उसाचा रस याचा अभिषेक करण्यास बंदी करण्यात आली होती.  दुपारी शहर परिसरातून त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरातील गर्दी पाहता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी देणगी दर्शनाचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता. पुरोहितांसह व्यवस्थापक, सुरक्षारक्षकांची अरेरावी पाहता अनेकांनी देणगी दर्शनाकडे पाठ फिरवली. परिवहन महामंडळाच्या वतीने ५० जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात शिवरात्रीनिमित्त कीर्तन परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोदा काठावरील निळकंठेश्वर महादेव मंदिरासह शहरातील अन्य शिवमंदिरात रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम राहिली. महाप्रसादासह, कीर्तन, भजन, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

श्री सोमेश्वर महादेव मंदिर

श्री सोमेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच संयोजन समितीच्या वतीने धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. विश्वस्तांच्या उपस्थितीत पहाटे महाभिषेक करण्यात आला. सकाळी आठ वाजता शहर परिसरातील बाल ते ज्येष्ठ कलावंत अशा १०५ तबलावादकांनी एक तालात ‘ओम ताल नम: शिवाय’चा जयघोष करत तबलावादन केले. विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंदिरात दर्शन घेतले. सायंकाळी सहा वाजता नंदकुमार देशपांडे यांचा ‘स्वरगंगा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

First Published on February 14, 2018 3:15 am

Web Title: mahashivratri celebrated by shiv bhakt in nashik