30 May 2020

News Flash

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘गांधी विचारांचा उत्सव’!

अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची २  ऑक्टोबर रोजी १५० वी जयंती आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची २  ऑक्टोबर रोजी १५० वी जयंती आहे. यानिमित्ताने शहर परिसरात ‘गांधी उत्सव’अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, जीवनउत्सव परिवार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत.

गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात गांधी उत्सवाचे मुख्य कार्यक्रम सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत होणार आहेत. ३० रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते गांधी उत्सव आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या उत्सवात महात्मा गांधींच्या चित्रांचे, चित्रपटाचे प्रदर्शन, जीवन उत्सव परिवारातर्फे प्रात्यक्षिक रूपात सादर करण्यात येणारे कापूस ते कापड हे खादीविषयक माहिती देणारे अनोखे प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधीजींचे चित्र काढण्याची स्पर्धा आणि प्रश्नमंजूषा, पुस्तक प्रदर्शन आणि विक्री इत्यादींचा समावेश असणार आहे.

गांधी उत्सवात उद्घाटन पूर्ववेळेत वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. तसेच सायंकाळच्या सत्रात कुसुमाग्रज स्मारकच्या विशाखा सभागृहात सहा वाजता ‘गांधीजी – काल, आज आणि उद्या’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान होणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या जिमखाना मैदानात गांधीजींचे विशाल रेखाचित्र आणि प्रबोधन फेरी काढण्यात येणारआहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे आणि मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सकाळी ११ वाजता पथनाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी होईल. सायंकाळच्या सत्रात ‘गांधीजी : सरळ आणि गहन’ या विषयावर ज्येष्ठ गांधी विचारक रमेश ओझा यांचे व्याख्यान होईल. इचलकरंजी येथील स्मिता पाटील नाटय़मंडळातर्फे ‘या गांधींचं करायचं काय?’ ही एकांकिका सादर होणार आहे.

महोत्सवाच्या समारोपात २ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता विशाखा सभागृहात सामूहिक सूतकताई आणि प्रार्थना होणार आहे. त्यानंतर सायंकाळी गांधी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात ‘गांधी डिलिट का करता येत नाही?’ या विषयावर समग्र चर्चा होणार आहे. यामध्ये आशुतोष शिर्के, अमेय तिरोडकर आणि गांधी विचारक डॉ. चित्रा रेडकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने गांधी उत्सवाचा समारोप होणार आहे.

गांधी विचारांचा हा उत्सव नाशिककरांसाठी खुला आहे. उत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी होऊन यातील व्याख्याने आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीवन उत्सव परिवार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोतर्फे करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 1:16 am

Web Title: mahatma gandhi akp 94
Next Stories
1 मोदींच्या सभेमुळे भाजपच्या आशा उंचावल्या
2 भाजप नगरसेवकांकडून पूरग्रस्तांना नऊ लाखांची मदत
3 मोदींना पाहण्यासाठी आलोय..
Just Now!
X