26 May 2020

News Flash

महात्मा फुले आरोग्य योजनेविषयी संबंधितांमधील विसंवादामुळे समस्या

सुरगाणा येथील भारती वाघमारे यांनी शनिवारी पहाटे तेथील सरकारी रुग्णालयात बालिकेला जन्म दिला.

नवजात शिशु मृत्यूप्रकरणी आरोप-प्रत्यारोप

आरोग्य विभागाच्या वतीने आदिवासी भागातील तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न होत आहेत. या अंतर्गत महात्मा फुले आरोग्य योजनेचा समावेश होत असला तरी या योजनेचा लाभ घेताना आरोग्य विभाग, रुग्ण आणि रुग्णालय यांच्यातील विसंवाद उघड होत आहे. मंगळवारी नवजात शिशु मृत्यू प्रकरणात हा विसंवाद ठळकपणे दिसून आला.

सुरगाणा येथील भारती वाघमारे यांनी शनिवारी पहाटे तेथील सरकारी रुग्णालयात बालिकेला जन्म दिला. जन्मत तिला श्वसनास त्रास होत असल्याने तातडीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी आवश्यक उपचारासाठी तज्ज्ञ नसल्याने महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत बालिकेला पंचवटी येथील आयुष या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर या ठिकाणी उपचार सुरू असताना सोमवारी रात्री ११ वाजता बालिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याआधी पैसे भरण्यास रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तहसीलदाराकडून दाखला आणण्यास सांगितले. सरकारी सुटी असल्याने दाखला मिळाला नाही. यामुळे मृतदेह ताब्यात देण्यात आला नसल्याची तक्रार मृताचे वडील गोविंद वाघमारे यांनी केली.

डॉ. संदीप पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. नवजात शिशुवर योग्य पध्दतीने उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री तिचा मृत्यू झाला. बाळाला दाखल करतानाच पालकांकडे काही कागदपत्रांची मागणी केली होती. ते अशिक्षित असल्याने त्यांना दाखला कुठून मिळवायचा ही माहिती नव्हती. वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही स्वतच्या जबाबदारीवर बाळावर शस्त्रक्रिया केली. परंतु त्यात अपयश आले. आम्ही ही घटना घडताच बाळाला घरी न्या, परंतु जी कागदपत्रे आहेत ती आणून द्या, असे सांगितले. घरी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. मंगळवारी सकाळी मृतदेह नेतो, असे पालकांनी सांगितल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. पालकांची कुठलीही अडवणूक झालेली नाही. उलट पालकांसोबत असलेल्या नातेवाईकांनीच आपणास धमकी दिल्याची तक्रारही डॉ. पाटील यांनी केली.

कार्यकर्त्यांची घुसखोरी

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्ण, विशेषत: आदिवासी भागातील रुग्णांना आवश्यक माहिती नसते. कागदपत्रे, संबंधित अधिकारी, अर्ज प्रक्रिया याची माहिती नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अथवा एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अशिक्षित असल्याने कार्यकर्ता सांगेल त्याप्रमाणे ते ऐकतात. हे कार्यकर्ते वैद्यकीय वर्तुळात नाहक ढवळाढवळ करत असल्याने डॉक्टर, परिचारिका यांना मनस्ताप होतो. आरोग्य विभागातील, मंत्रालयातील ओळखीचा दबाव डॉक्टरांवर आणला जातो. या पाश्र्वभूमीवर रुग्ण, त्याचे नातेवाईक, योजना राबविणारे खासगी रुग्णालय यांच्यातील संवाद वाढावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 1:43 am

Web Title: mahatma jyotiba phule jan arogya yojana the child died akp 94
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर अत्याचार
2 समाज माध्यमांचा मुलांवर विपरीत परिणाम
3 महापालिका सभेत गोंधळ!
Just Now!
X