महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचा ठराव

अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणात इतर मागास विद्यार्थ्यांना ५० ऐवजी १०० टक्के शिष्यवृत्ती तसेच शुल्क परतावा मुदतीच्या आत मिळावा यासह इतर मागासवर्गीयांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी २७ जुल रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा ठराव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बठकीत करण्यात आला.

येथील काशी माळी मंगल कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने रविवारी आयोजित बैठकीत समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बापू भुजबळ, परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉ. कैलास कमोद, आ. जयवंत जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व समता सनिकांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी संघटित होण्याचे आवाहन बापू भुजबळ यांनी केले.

आमदार छगन भुजबळ यांना सरकारकडून सूड बुद्धीने तुरुंगात डांबण्यात आले असून त्यांचा आवाज दडपण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी कँाग्रेस पक्ष व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते डॉ. कैलास कमोद यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटित होऊन ओबीसींच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी २७ जुल रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले. केंद्रातील मनुष्यबळ विभागाकडून केंद्रीय शिक्षण संस्थांच्या २७ टक्क्याच्या आरक्षणात फेरबदल केले जात असल्याने निषेध व्यक्त करून आरक्षण कायम राहण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यकारिणीतील इतर ठरावांमध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या स्मृती वर्षांनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून सहा लाख रुपये करावी यांचा समावेश आहे. यावेळी आ. जयवंत जाधव, प्रा. श्रावण देवरे, ज्येष्ठ नेते जी. जी. चव्हाण, माजी आमदार पांडुरंग अभंग, लक्ष्मणराव तायडे, रामभाऊ सातव, महिला आघाडीच्या प्रमुख पार्वती शिरसाठ, कविता कर्डक आदींनी मनोगत व्यक्त केले.