महावितरणने लढवलेली शक्कल कामी; मोबाइल अ‍ॅपद्वारे १० हजार ग्राहकांकडून स्वत:च्या वीज मीटरची नोंद सादर

नाशिक : अवास्तव वीज देयकांवरून होणारा गदारोळ टाळण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या वीज मीटर नोंदणीचे छायाचित्र त्यांच्याकडून मागविणे आणि त्यावरून देयक अदा करण्याची महावितरणने लढवलेली शक्कल कामी आली आहे. त्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत १० हजार ८८६ ग्राहकांनी आपल्या मीटरची नोंद महावितरणकडे पाठविली आहे. एकंदरीत अवास्तव देयकांवरून होणारा गदारोळ टाळण्यासाठी महावितरणने ग्राहकांना कामाला लावल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

महावितरण ग्राहकांना दरमहा वापरलेल्या विजेचे देयक देते. ते त्यांच्या मीटरवर असलेल्या नोंदीच्या आधारावर दिले जाते. मीटर नोंद अचूक प्राप्त झाल्यास देयकही अचूकच असते, असे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु कुठल्याही कारणास्तव नोंद प्राप्त झाली नाही

किंवा मीटर सदोष असले तर देयकसुद्धा सरासरी वापरानुसार असू शकते. महावितरणच्या भ्रमणध्वनी अ‍ॅपव्दारे ग्राहक घरबसल्या आता आपली मीटर नोंद पाठवू शकतात. त्यानुसार देयक प्राप्त करू शकतात. ज्या ग्राहकांचे भ्रमणध्वनी क्रमांक महावितरणकडे नोंदलेले आहेत, त्यांना नोंद पाठविण्याचा संदेश मिळाल्यापासून पाच दिवसांत नोंद पाठवू शकतात.  ज्या ग्राहकांचे भ्रमणध्वनी क्रमांक महावितरणकडे नोंदणी झालेले नसतील, त्यांना संदेश पाठविला जाणार नाही. त्यांनी आपल्या मागील महिन्याच्या किंवा जुन्या देयकावरील चालू महिन्याचे नोंदीची तारीख बघावी म्हणजे त्या तारखेच्या किमान एक दिवस आधीपासून असे पाच दिवसांत नोंदी पाठवू शकतात. यासाठी ग्राहकास १२ अंकी ग्राहक क्रमांक आवश्यक आहे. महावितरणच्या आवाहनास आतापर्यंत दहा हजारहून अधिक ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे.

ग्राहकांनी मीटरवरील नोंद पाठविताना मागील महिन्यातील नोंदीशी तुलना करून घ्यावी. मागील महिन्यातील नोंदीपेक्षा सध्याची नोंद संख्या जास्त असायला हवी. यामुळे नोंदी आणि वापराबद्दल शंका न राहता आपल्या वापराबद्दल आणि देयकाबाबत निश्चितता येऊन दुरुस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे महावितरणने म्हटले आहे. यासाठी ग्राहकांनी त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करावी आणि कुठल्याही तक्रारीसाठी १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. प्रत्यक्ष वीज वापरानुसार देयक देणे शक्य व्हावे यासाठी या ग्राहकांनी त्यांच्या मीटर नोंदीचे छायाचित्र भ्रमणध्वनी अ‍ॅपच्या माध्यमातून स्वत:हून द्यावे. त्यामुळे ग्राहकांना वास्तविक वापराचे आणि अचूक वीज देयक देण्यास मदत होईल. या सुविधेचा ग्राहकांनी वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्राहकच कामाला

महावितरणने ग्राहकांना वीज मीटरच्या नोंदी पाठविण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती दिली आहे. टाळेबंदीच्या काळात नोंदी न घेता दिल्या गेलेल्या सरासरी देयकांचा विषय अद्याप गाजत आहे. पुढील काळात वीज देयकांवरून पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून महावितरण ग्राहकांना स्वत:च्या वीज मीटरची नोंद करायला सांगत असावी, असाही कयास आहे. या नोंदी घेण्यासाठी कंपनीला स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. ग्राहकांनी आधिक्याने स्वत: नोंदी पाठविण्यास सुरुवात केली तर महावितरणला प्रति ग्राहकापोटी द्याव्या लागणाऱ्या शुल्कातही बचत होणार आहे. ग्राहकांना कामाला लावून वीज कंपनी वीज देयकांबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या आक्षेपांतून सुटका करून घेण्याच्या मानसिकतेत असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.