सात व्ॉटचा एलईडी बल्ब ६० व्ॉटच्या ‘इन्कन्डेसन्ट बल्ब’ इतकाच प्रकाश देतो. शिवाय, तो दीर्घ काळ टिकणारा व न फुटणारा आहे. घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेंतर्गत प्रत्येक ग्राहकास शंभर रुपयात सात व्ॉटचा बल्ब देण्याची योजना असून याद्वारे वीज बचत करता येईल. या एलईडी बल्ब वितरणास शुक्रवारी महावितरणच्या नाशिकरोड कार्यालयात सुरुवात झाली असून ही योजना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय, वीजदेयक भरणा केंद्र आदी ठिकाणी स्टॉलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिकरोडच्या विद्युतभवन येथील बल्ब स्टॉलचे उद्घाटन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकारच्या माध्यमातून एनर्जी एफिशिएन्सी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड आणि महावितरण यांच्या माध्यमातून घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात हे बल्ब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बराच काळ टिकणारा हा बल्ब बाजारात ४०० रुपयांपर्यंत मिळतो. या योजनेत हा बल्ब १०० रुपयांत दिला जाईल. प्रत्येक ग्राहकास दहा बल्ब घेता येतील. त्यातील चार बल्ब सवलतीच्या दरात मिळतील. त्यास तीन वर्षांची मोफत बदलून देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. हे एलईडी बल्ब १०५ रुपये आगाऊ भरून घेता येतील. उर्वरित रक्कम दहा समान मासिक हप्त्यात देयकामार्फत घेतली जाईल, असे महावितरणने म्हटले आहे. ग्राहकांना या योजनेव्यतिरिक्त अधिकचे बल्ब कंपनीकडून पूर्ण किमतीत घ्यावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी वीजदेयकाची मूळ प्रत आणि छायाचित्र ओळखपत्राचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाशिकरोड येथे वितरणास सुरुवात झाल्यानंतर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.