News Flash

विमानतळाच्या धर्तीवर मुख्य बसस्थानक

एकाचवेळी २० गाडय़ा उभ्या राहणे शक्य

सीबीएस बसस्थानकाचा आराखडा

१४ कोटींच्या आराखडय़ास अर्थमंत्र्यांची मंजुरी; एकाचवेळी २० गाडय़ा उभ्या राहणे शक्य

विमानतळात प्रवेश करताना जशी वेगळी अनुभूती मिळते, काहीशी तशीच अनुभूती लवकरच शहरातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या मध्यवर्ती (सीबीएस) आणि मेळा बसस्थानकात मिळणार आहे. कारण, या दोन्ही बसस्थानकांच्या नूतनीकरण आराखडय़ात नाशिकच्या पौराणिक व सांस्कृतिक संदर्भाचा जसा विचार झाला, तसाच वातानुकूलन यंत्रणा, अत्याधुनिक सुरक्षा, भुयारी वाहनतळ, एकाचवेळी २० बसगाडय़ा उभ्या राहतील असा फलाट आदी सुविधांचा विचार केला गेला आहे. विमानतळाच्या धर्तीवर बनविलेल्या बसस्थानकांच्या १४ कोटी रुपयांच्या आराखडय़ाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मंजुरीही दिली आहे. त्यामुळे या बस स्थानकांवर लवकरच वेगळी अनुभूती प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

शहराच्या मध्यवर्ती भागात सीबीएस आणि मेळा ही दोन्ही बसस्थानके आहेत. शहरातील सर्वात जुन्या बसस्थानकांत कोणतीही सुधारणा आजतागायत झाली नव्हती. या स्थानकातून दिवसभरात हजारो प्रवासी प्रवास करतात.

स्थानकावरील असुविधांविषयी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. या पाश्र्वभूमीवर, आपण दोन्ही स्थानकांना भेट देऊन स्थानकांच्या नूतनीकरणासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा चालविला असल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली.

मध्यंतरी अर्थमंत्र्यांनी राज्यातील पाच बसस्थानके अद्ययावत करण्यासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यात नाशिकच्या दोन्ही स्थानकांचा समावेश होता. या स्थानकांचे आधुनिकीकरणांतर्गत बांधकाम, विस्तारीकरण, दर्जावाढ अशा विविध कामांना मान्यता दिली देण्यात आली. या बसस्थानकांसाठी मंजूर एकूण पाच कोटीच्या निधीत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत मुनगंटीवर यांनी खर्चास तत्वत: मान्यता दिली आहे.

परिवहन मंडळास आराखडा तयार करण्यासाठी खासगी वास्तुरचनाकाराची नियुक्ती करण्यात आली. इंदापूर, सेलू, वडगाव सातारा, शिरूर कराड येथील अद्ययावत बसस्थानकांचे आराखडे तयार करणारे प्रशांत कुलकर्णी यांच्याकडून नाशिकच्या स्थानकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नूतनीकरणांद्वारे दोन्ही बसस्थानकांचे रूपांतर विमानतळाप्रमाणे होणार असल्याचा विश्वास फरांदे यांनी व्यक्त केला. या बसस्थानकांच्या अद्ययावतीकरणासाठी १४ कोटींच्या आराखडय़ालाही मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या बसस्थानकाची वैशिष्टय़े

  • ५५ हजार चौरस फूट जागा
  • एकाचवेळी २० बसगाडय़ा थांबतील असा फलाट
  • बस स्थानकाचा अंतर्गत परिसर वातानुकूलीत
  • अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, स्कॅनिंग मशीन
  • व सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा
  • नाशिकची पौराणिक माहिती चित्र स्वरूपात झळकणार
  • पासधारक व आरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था
  • भुयारी वाहनतळात दुचाकी उभ्या करण्याची सुविधा
  • पहिल्या मजल्यावर वाहक व चालकांसाठी स्वतंत्रपणे निवारा कक्ष

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:07 am

Web Title: main bus depot at airport land in nashik
Next Stories
1 बँकांबाहेरील रांगांना निवडणुकीचा रंग
2 खगोलप्रेमींसाठी अभ्यासपूर्ण आठवडा
3 आरोग्य विद्यापीठाकडून ‘क्लिनिकल ट्रायल डिपार्टमेंट’ संकल्पना
Just Now!
X