X
X

पतंगोत्सवावर ‘मोदी-ट्रम्प’ मैत्रीची छाया

READ IN APP

‘जीएसटी’ लागूनही उत्साह कायम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांविषयी बरीच चर्चा होत असते. उभय नेत्यांमधील मैत्रीचे प्रतिबिंब आता थेट येवल्यातील पतंगोत्सवात उमटले आहे. मकर संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर, येवल्यात पतंगोत्सवाची लगबग सुरू असताना पतंगींवर झळकणारी ‘मोदी-ट्रम्प’ यांची एकत्रित छबी सर्वाचे लक्ष वेधत आहे. वारा ज्या दिशेने वाहतो, त्या दिशेने पतंग उडते. पतंगीचा हा गुण तसा सर्व क्षेत्रात लागू होतो. पतंगनिर्मिती करणारे व्यावसायिक काळाच्या ओघात नवनवीन संकल्पना लढवत पतंगप्रेमींना आकर्षित करीत असतात. पतंग आणि मांजावर भले जीएसटी लागू झाला असेल, पण उत्साही मंडळींनी त्या पतंगीला पसंती दिल्याचे दिसते.

येवल्याच्या पतंगोत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. भोगी, मकरसंक्रांत आणि कर असे सलग तीन दिवस आबालवृद्धांसह घरातील महिला-पुरुष, बच्चेकंपनी असे सर्व घटक पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटतात. सध्या सर्वत्र पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे.   सध्या कोणतीही निवडणूक नाही. अनेकवेळा निवडणुकीचा प्रचार स्थानिक मंडळींनी पतंगीवर स्वत:ची छबी झळकावत केल्याची उदाहरणे आहेत. कधीकाळी माशाचे चित्र घेऊन समोर येणाऱ्या पतंगीने गेल्या काही वर्षांत देशातील नेत्यांसह क्रिकेटपटू, अभिनेते, अनेक रंग, पक्षीय चिन्हे आदींची छबी धारण केल्याचे येवलेकर सांगतात.  सद्दाम हुसेनच्या छबी असणाऱ्या पतंगीही येवलेकरांनी पाहिल्या आहेत.  वर्षभरात मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीची चांगलीच चर्चा झाली.  हा विषय तसा महत्त्वाचा. हे लक्षात घेऊन पतंग बनविणाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांची मैत्री पतंगीतून अधोरेखित केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची दखल या निमित्ताने घेतली गेली.  शहराच्या स्थापनेनंतर गुजराती समाज बांधव येथे आले. त्यांनी पतंगोत्सव शहरात आणला. आज या उत्सवाने सर्व सीमा पार केल्या आहेत. मुस्लीम बांधवही या उत्सवात सहभागी होतात. या अनोख्या पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी परगावातील आणि परदेशातील पाहुणे मंडळींनाही निमंत्रण देण्याचे काम सुरू आहे.

‘जीएसटी’ लागूनही उत्साह कायम

स्थानिक कारागिरांनी बनविलेल्या तसेच सुरत, अहमदाबादी पतंगांना विशेष मागणी आहे. या वर्षांपासून पतंगीवर पाच, तर मांजावर १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी पतंगप्रेमींचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.

22
X