मालेगाव महानगरपालिकेत बुधवारी काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात शिवसेनेने उपमहापौरपद आपल्या पदरात पाडून घेतले. मालेगाव महापालिका स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपदाचा मान मिळाला आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या येथील महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. या त्रिशंकू महापालिकेत ८४ पैकी सर्वाधिक २८ जागा जिंकणारी काँग्रेस आणि २७ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी-जनता दल युतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली होती. बहुमताचा ४३ हा आकडा गाठण्यासाठी तेरा जागा मिळविणारी शिवसेना, नऊ जागा मिळविणारा भाजप व सात जागा मिळविणारा एआयएम या तिन्ही पक्षांची मदत मिळविण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले. त्यात शिवसेनेची साथ मिळविण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याने काँग्रेस-सेना आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीची युती व्हावी यासाठीही प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर काँग्रेस-शिवसेना यांनी एकत्रित येत सत्ता स्थापनाचा दावा केला. निवडणुकीत कोणताही दगाफटका नको म्हणून सर्व पक्षांनी आपापल्या सदस्यांना एकत्रितरीत्या पर्यटनास पाठवले होते.

महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु होताच राष्ट्रवादी-भाजपा युतीचे दोन सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपाच्या नबी अहमद अहमदुल्ला यांना ३४ मतं मिळाली तर महापौर रशिद शेख यांना २१ मते मिळवून निवडून आले. उपमहापौर निवडणुकीत मात्र एमआयएम प्रमाणे भाजपाचे ७ सदस्य तटस्थ राहिल्याने शिवसेनेच्या सखाराख घोडके यांना ४१ तर राष्ट्रवादी-भाजपाचे अन्सारी मसूद अहमद यांना केवळ २७ मते मिळाली.