News Flash

मनसेचे इंजिन हद्दपार

पालिकेत गेल्यावेळी असलेल्या ८० जागांपैकी मनसेकडून तीस ठिकाणी उमेदवार उभे केले गेले होते.

मनसेचे इंजिन हद्दपार

मालेगाव महापालिका निवडणूक

भविष्यात मालेगावमध्ये चांगली पाळेमुळे पसरवू शकेल असा विश्वास निर्माण करण्यात कधीकाळी यशस्वी ठरलेल्या मनसेचे इंजिन या निवडणुकीतून अक्षरश: हद्दपार झाले आहे. महापालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये आश्वासक यश मिळविल्यानंतर सातत्याने प्रगतीचा आलेख घसरलेल्या आणि सध्याच्या घडीला अस्तित्वहीन बनलेल्या या पक्षाला यावेळी एकही उमेदवार देणे शक्य झाले नाही.

मनसेचा जन्म झाल्यावर २००७ मध्ये झालेल्या येथील महापालिका निवडणुकीत सुनील गायकवाड व बाळासाहेब अहिरे हे दोघे मनसेकडून विजयी झाले होते. दरम्यानच्या काळात मनसेच्या जिल्हा नेत्यांशी मतभेद निर्माण झाल्यावर गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आपल्या समर्थकांना सोबत घेऊन मग गेल्यावेळी त्यांनी मालेगाव विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढविली होती. नगरसेवक गायकवाडांनी पक्ष सोडला तरी शहरात बऱ्यापैकी पक्षाची ताकद होती. किंबहुना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येथील मुस्लीम समाजात निर्माण झालेल्या एका वेगळ्या ‘क्रेझ’ मुळे मुस्लीमबहुल मालेगावात या पक्षाला चांगले भवितव्य असल्याचे अनुमान राजकीय वर्तुळात काढले जात होते. गेल्यावेळच्या निवडणुकीत उमेदवारी मागण्यासाठी या पक्षाकडे मुस्लीम समाजातील इच्छुकांची झालेली गर्दी हे तसेच दर्शवत होती. एकाचवेळी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समाजाची मोट बांधण्याची या पक्षात क्षमता असल्याचे मानत हा पक्ष महापालिकेत दबदबा निर्माण करू शकेल असा अंदाजही बांधला जाऊ लागला होता.

पालिकेत गेल्यावेळी असलेल्या ८० जागांपैकी मनसेकडून तीस ठिकाणी उमेदवार उभे केले गेले होते. त्यातील मुस्लीमबहुल भागातील उमेदवारांची संख्या सतरा होती. मुस्लीम वस्त्यांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी थाटलेली प्रचार कार्यालये व एकूणच त्यांचा प्रचार हा तेव्हा आश्चर्याचा तसेच चर्चेचा विषय ठरला होता.

मालेगाव महापालिका निवडणुकीआधी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने घवघवीत यश मिळवत सत्ता प्राप्त केली होती. या पाश्र्वभूमीमुळे गेल्यावेळच्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या छावणीत सर्वत्र उत्साह संचारल्याचे जाणवत होते. महापालिका निवडणुकीची राज ठाकरे यांची नाशिकमधील प्रचारसभा चांगली गाजली होती. त्यामुळे मालेगावातही ठाकरे यांची तशाच पध्दतीची दणक्यात प्रचारसभा घेतली जावी म्हणून पक्षांतर्गत आग्रह सुरू झाला. तेव्हा मालेगावात ठाकरे यांची प्रचारसभा झालीदेखील. परंतु नाशिकप्रमाणे ती सभा परिणामकारक झाली नाही.

राज ठाकरेंच्या वादग्रस्त विधानांचा परिणाम

सुमारे तीनशे कोटींचा दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना भुजबळ यांच्याशी संबधित कंपनीने मातीमोल भावात घशात घातल्याचा आरोप करत कामगार व सभासदांनी तेव्हा रान पेटविले होते. राष्ट्रवादीच्या भुजबळांना या कार्यात सेनेचे आमदार दादा भुसे यांनी केलेली ‘कथित’ मदत तसेच उभयतांमधील ‘दोस्ताना’, जाती-धर्माच्या नावाने केले जाणारे राजकारण, शहर विकासाची लागलेली वाट, पालिकेतील ‘कथित’ भ्रष्टाचार हे व यासारखे स्थानिकांना भावतील असे अनेक मुद्दे ठाकरे यांना फटकेबाजीसाठी उपलब्ध असतांना ते बाजुला सारत प्रचारसभेतील त्यांचे भाषण भरकटत गेले. मालेगावातील विशिष्ट भाग जणू अतिरेक्यांचे आश्रयस्थान आहे, अशा आशयाच्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मतदारांचाच नाही तर, खुद्द अनेक उमेदवारांचाही अपेक्षाभंग झाला होता. त्यामुळे या सभेपासून फायदा कमी अन् तोटा जादा असा समज झालेल्या मुस्लीम भागातील मनसेच्या बऱ्याच उमेदवारांवर सभा झाल्यावर रात्रीतून प्रचार कार्यालये गुंडाळून ठेवण्याची वेळ आली होती. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. चांगल्या अपेक्षा उंचावलेल्या मुस्लीम भागातून मनसेचा एकही उमेदवार यशाला गवसणी घालू शकला नाही.

पक्षवाढीसाठी प्रयत्न नाही

हिंदूबहुल भागात सेनेसमोर कडवे आव्हान उभे करणाऱ्या मनसेचे गुलाब पगारे व बाळासाहेब अहिरे हे दोघे निवडून आले. हे यश फार नाही पण भाजपसारख्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून येत नसतांना मनसेला मिळालेल्या दोन जागांचे महत्व नक्कीच मोठे होते. शिवाय त्यांच्या सहा उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. दरम्यानच्या काळात सर्वत्र होणारी पडझड व पक्षवाढीसाठी अजिबात न झालेले प्रयत्न या सर्वाचा परिणाम म्हणून हा पक्ष मालेगावात होत्याचा नव्हता झाला. नगरसेवक पगारे यांनी आता भाजपची वाट धरत निवडणुकीत उडी घेतली आहे. पक्षाचे दुसरे नगरसेवक अहिरे यांनी सेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले होते. परंतु उमेदवारीसाठी आधीच मोठी चढाओढ असलेल्या सेनेत ऐनवेळी पत्ता कट झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. तालुकाध्यक्ष पप्पू पवार यांनी सेनचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी पक्षाकडे उमेदवारीसाठी ना कुणी इच्छा व्यक्त केली, ना पक्षाने त्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. ८४ जागा असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यामुळे यावेळी एकही उमेदवार नसल्याने ‘कहाँसे कहाँ तक’ अशी मनसेची झालेली अवस्था हाही एक चर्चेचा विषय झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 1:24 am

Web Title: malegaon municipal corporation election 2017 mns in malegaon
Next Stories
1 अधिवेशन स्थळाऐवजी विश्रामगृहातच अधिक धावपळ
2 लग्नसराईत उमेदवारांकडून प्रचाराचा ढोल
3 ‘मुरांबा’च्या प्रसिद्धीसाठी नवमाध्यमांचा वापर
Just Now!
X