माता व बालमृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासह विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. दुसरीकडे, गांव पातळीवर बाल विकास केंद्र बंद पडल्याने कुपोषणाशी संबंधित कामास काही अंशी खिळ बसल्याने कुपोषित बालकांवर होणाऱ्या उपचाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गुरूवारी देवळा तालुक्यातील खालप येथे उपचारासाठी दाखल झालेली दोन वर्षीय बालिका कुपोषित असल्याचे आढळून आल्याची घटना त्याचे निदर्शक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या बालिकेला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
बागलाण तालुक्यातील औदाणे येथील शेतमजूर प्रकाश वाघ यांची मुलगी खुशी (२) ही देवळा तालुक्यातील खालप येथे कृष्णा पवार यांच्याकडे आजोळी आली होती. आठ दिवसांपासून तिची तब्येत सातत्याने खालावली. स्थानिकांनी पुढाकार घेत खुशीला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले असता तिची प्रकृती तीव्र कुपोषित अर्थात ३ एच. डी.च्या टप्प्यावर गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिला मालेगाव शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. खुशी ही स्थलांतरित असल्याने तिच्याकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर मुलीची प्रकृती नाजूक असताना कुटुंबीयांनी योग्य काळजी न घेतल्याने, भ्रामक समजुतीमुळे तिची अशी अवस्था झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.