‘आहार, आजार, उपचार’ वर आधारित तीन महिन्यांचा कार्यक्रम

येथील सोशल फोरमच्या वर्धापन दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्याला कुपोषण मुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्र्यंबक तालुक्यात अनेक बालक कुपोषित किंवा कुपोषणाच्या सीमा रेषेवर आहेत. या बालकांसाठी आहार, आजार आणि उपचार या त्रिसूत्रींवर आधारित तीन महिन्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

समाज माध्यमांचा संवादापेक्षा विसंवादासाठी वापर होण्याच्या काळात सोशल नेटवर्किंग फोरम सामाजिक दृष्टीकोन ठेवत काम करीत आहे. समाज माध्यमावरील तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने २०१० मध्ये सुरू झालेल्या या अभियानाने हजारो वंचितांना मदतीचा हात दिला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून फोरमने कुपोषणमुक्तीचा संकल्प सोडला आहे.

नाशिक शहरातील निष्णात बालरोग तज्ज्ञ आदिवासी पाडय़ांवर जाऊन बालकांची तपासणी करतील. तपासणीसाठी नाशिक जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. संगीता लोढा यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक बालकांच्या कुपोषणाचे कारण ओळखून त्यांना औषधे देईल. कुपोषणाच्या कारणांचा अभ्यास करून त्यावरील अंदाजित औषधे निश्चित करण्यात आली असून नाशिक जिल्हा ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनच्यावतीने ती पुरविण्याचे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मान्य केले आहे. या शिवाय पूरक अन्नाच्या मदतीसाठी नागरिकांना आणि समाज माध्यमावर आवाहन करण्यात येणार आहे. या कामासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचेही योगदान डॉ. मंगेश थेटे आणि डॉ. हेमंत सोननीस यांच्या प्रयत्नातून लाभणार आहे.

जमा झालेल्या मदतीतून या बालकांसाठी तीन महिन्यांसाठी पूरक अन्न देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औषधोपचार, तीन महिने आहार काटेकोर दिला जावा यासाठी त्र्यंबक तालुक्याचे सहायक गटविकास अधिकारी समीर वाठारकर, बाल विकास प्रकल्पाधिकारी सागर वाघ आणि आमोल दिघोळे, पर्यवेक्षीका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासह शासकीय यंत्रणा मदत करणार आहे.

तीन महिन्यांच्या उपक्रमातून त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषण हद्दपार करण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह डॉ. पंकज भदाणे, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, डॉ. योगेश जोशी, डॉ. विशाल पवार, डॉ. हेमराज धोंडगे, डॉ. राहुल सावंत, डॉ. किशोर भंडारी, डॉ. उत्तम फरतळे अशा फोरमच्या अनेक डॉक्टर्सचे पथक कार्यरत आहेत.

आजवरचे उपक्रम

फोरमने मागील सात वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबविले. आठ आदिवासी गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण केले. १२ हजार रोपांची लागवड करत त्यातील ७० टक्के रोपे जगवण्यात यश मिळवले. दहा आदिवासी शाळांचे आधुनिक डिजिटल स्कूलमध्ये रुपांतर, दहा शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत, २०० वृध्दाश्रम-अनाथालये-सामाजिक संस्थांना मदत, सहा हजारहून  अधिक रक्त बाटल्यांचे संकलन, तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना न्याय आणि मदत आदींचा त्यात समावेश असल्याची माहिती फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली.