23 March 2019

News Flash

कुपोषण मुक्तीच्या उपक्रमाने १८२ बालकांच्या वजनात वाढ

जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ात सुमारे १५ हजार कुपोषित बालके आढळल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर केली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कुपोषण मुक्ती उपक्रमांत सहभागी पालक आणि बालके 

शासनाने संपूर्ण राज्यात उपक्रम राबविण्याची फोरमची सूचना

सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुका कुपोषण मुक्ती उपक्रमांतर्गत तीन महिन्यात १८२ बालकांचे सरासरी १.०१ किलोने वजन वाढविण्यात यश आले आहे. फोरमचा उपक्रम आणि शासकीय कार्यक्रम यांच्यातील विरोधाभास बालरोगतज्ज्ञ, डॉक्टर, फोरमचे पदाधिकारी यांनी मांडला. त्र्यंबकेश्वर आणि हरसूल परिसरात राबविलेल्या या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाची यशस्वीता लक्षात घेऊन शासनाने त्याची संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी अंमलबजावणी करावी, अशी मागणी फोरमने केली आहे.

जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ात सुमारे १५ हजार कुपोषित बालके आढळल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. कुपोषण मुक्तीसाठी शासन प्रयत्नरत असते. परंतु, शासकीय उपक्रमातून जे साध्य होत नाही, ते केवळ तीन महिन्यात फोरमने नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटना, आयएमए आणि जिल्हा औषध विक्रेते संघटना यांच्या सहकार्यातून साध्य केल्याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले. आदिवासी भागात काम करताना आढळलेल्या कुपोषणाच्या समस्येवर काम करण्यासाठी डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यात नियोजनपूर्वक हा प्रकल्प राबविल्याचे फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. त्यात नाशिक जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटना, आयएमआय, नाशिक जिल्हा औषध विक्रेता संघटना, शासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका. अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य मिळाले.

यासाठी त्रंबकेश्वर तालुक्यातील ३५३ मुलांची नोंदणी करण्यात आली. प्रत्येक बालकाची दर महिन्याला तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्लय़ाप्रमाणे मुलांना औषधोपचार आणि पोषक आहार पुरविण्यात आला. यापैकी २८२ मुलांनी दोनपेक्षा अधिक शिबिरांना हजेरी लावली, तर ७१ मुले एका शिबिराला उपस्थित होते.

कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दंड घेर, डोक्याचा घेर या परिमाणांऐवजी मुलांचे वजन वाढवणे या निकषावर भर देण्यात आला. सर्वाच्या अथक परिश्रमानंतर कुपोषण मुक्ती पथकाने तयार केलेल्या निदान, उपचार आणि आहार या त्रिसूत्रीला प्रतिसाद मिळाला.

कुपोषित बालकांची तपासणी, आजारनिहाय उपचार, पोषक आहार देण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या दीपा जोशी, सुलभा पवार, तृप्ती महात्मे, माधवी गोऱ्हे-मुठाळ, शीतल पगार या डॉक्टरांसह इतरांनी या प्रकल्पातील अनुभव कथन करीत शासकीय उपक्रम आणि हा उपक्रम यातील फरक मांडला.

साक्षरतेचे प्रमाण अल्प असल्याने आदिवासी बांधव कोणत्याही प्रश्नावर सजग नसतात. कुपोषित बाळ जन्माला येण्याचे कारण पौगंडावस्थेतील मुलगी, गर्भार मातेचे पोषण नसणे हे आहे. आईला पोषण आहार मिळत नसल्याने कमी वजनाची मुले जन्माला येतात. मुलांचे पोषण नीट होत नाही. कुपोषित बालकांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे.

योजनेतील त्रुटी

आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनासाठी सरसकट एकच कार्यक्रम राबविला जातो. कुपोषित बालकांची वैयक्तिक तपासणी करून निदान होत नाही. पोषक आहार, औषधे यांचा पुरवठा होत असला तरी त्याचे नियोजन नसते. कुपोषित बालकाची जबाबदारी अंगणवाडी सेविकेवर सोपविलेली आहे. कुटुंबीय अनास्था दाखवितात. आई-वडील कामावर गेल्यावर मद्यपी नातेवाईक बाळांना सांभाळतात. अथवा घरातील अन्य बालक त्यांचा सांभाळ करते. संबंधितांकडून बाळाच्या खाण्या-पिण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शासनाकडून पोषक आहार कच्च्या स्वरुपात दिला जातो. कुटुंबीयांनी तो शिजवून मुलास देणे अपेक्षित आहे, परंतु महिनाभराचा आहार कुटुंबीय काही दिवसात संपवून टाकतात. शासन बालक आवडीने खातील असे तयार खाद्यपदार्थ देत नाही..

उपक्रमाचे फलित

योग्य निदान, औषधोपचार आणि मुलांना आवडेल अशा पोषक आहारामुळे केवळ तीन महिन्यात ६५ टक्के (२८२ पैकी १८२) मुलांचे वजन सरासरी १.०१ किलोने वाढले. या उपक्रमादरम्यान छगन ढोले, वर्षां बामणे आणि अभय गुरव या अतितीव्र कुपोषित बालकांवर उपचार करून प्राण वाचविण्यात यश मिळाले. पालकांचे प्रबोधन केल्याने पालक आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ लागले. कुपोषणाच्या कारणांप्रमाणे दिलेल्या आयर्न, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअमसारख्या औषधांमुळे बालकांमध्ये सकारात्मक शारीरिक बदल जाणवले. या प्रकल्पात शहरातील १८ बालरोग तज्ज्ञ स्वखर्चाने सहभागी झाले. नाशिक औषध विक्रेता संघटनेने बालकांसाठी औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली. मुलांच्या पोषक आहारासाठी आयएएमने पावणे दोन लाख रुपये, तर फोरमने समाज माध्यमांवर आवाहन करून उर्वरित असा एकूण पाच लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. त्यातून चकली, लाडू, बर्फी, चिक्की असे खास खाद्यपदार्थ तयार करण्यात आले. या त्रिसूत्रीने बालकांचे वजन वाढविण्यात यश मिळाले.

बालरोग तज्ज्ञांची निरीक्षणे

  • मुलांच्या वाढीसाठी योग्य आहाराचे महत्त्व पालकांना पटविणे आवश्यक.
  • गर्भारपणात आईच्या पोषणाची काळजी घेणे.
  • सहाव्या महिन्यापासून बाळाला बाहेरील पातळ पदार्थ आणि नंतर घन आहार सुरू करणे.
  • खाद्यपदार्थाचा दर्जा, आरोग्य-स्वच्छतेबाबत दक्षता
  • अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांना मूलभूत आरोग्य ज्ञान देणे
  • महत्त्वाच्या आजारांवरील लसीकरण योग्यवेळी होणे गरजेचे.

First Published on June 14, 2018 1:23 am

Web Title: malnutrition issue maharashtra government 2