28 January 2020

News Flash

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक

राज्यातील १२ ते १५ महिलांची फसवणूक

राज्यातील १२ ते १५ महिलांची फसवणूक

नाशिक : राज्यातील अनेक भागातील घटस्फोटित महिला, विधवा, विवाहेच्छुक महिलांना  लग्नाचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी संशयित संपत दरवडे उर्फ मनोज पाटीलला शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. संशयिताने नागपूर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिकसह मध्यप्रदेश, इंदूर येथील सुमारे १२ ते १५ महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले झाले. आर्थिक लाभातून संशयिताने पुणे येथे सदनिका आणि अलिशान चारचाकी मोटारी खरेदी केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्गच्या मालवण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ातील संशयित संपत चांगदेव खाडे उर्फ मनोज पाटील (३४) हा नाशिक येथे महिलेची फसवणूक करण्यासाठी येत असल्याची माहिती पीडितेच्या भावाकडून मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी पीडित महिला, तिचा भाऊ यांच्या मदतीने योजना आखून संशयितास पंचवटी कारंजा येथील मानस हॉटेलमध्ये बोलावले. तिथेच संशयिताला ताब्यात घेण्यात आले. संशयिताविरुद्ध पीडित महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेला संशयित संपत दरवडे  उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर पाटील अशी नावे बदलून महिलांची फसवणूक करतो. दरवडेचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. २०१५ मध्ये त्यास अपत्य झाले. परंतु, ते मृत पावले. तेव्हा संशयितावर १२ ते १३ लाखाचे कर्ज झाले होते. याच काळात एका  घटस्फोटित महिलेशी त्याची ओळख झाली. त्यातून जवळीक निर्माण झाली. तिने त्यास लग्न केल्यास आर्थिक मदत करून अडचण दूर करण्याचे आश्वासन देत ५० हजार रुपयांची मदत केली. यामधून संशयिताने पैसे कमावण्याची नामी युक्ती शोधून घटस्फोटिता, विधवा आणि विवाहेच्छुक महिलांना हेरून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यास सुरुवात केली.  पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, धर्मराज बांगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संकेतस्थळावरून महिलांचा शोध

संशयिताने विवाह विषयक संकेतस्थळांचा घटस्फोटितांचा शोध घेण्यासाठी वापर केला. मूळ नांव बदलून वेगळ्या नावाने स्वत: घटस्फोटित असल्याचे भासवून खाते उघडून बनावट माहिती दिली. या आधारे संशयित पीडित महिलांशी संपर्क साधून, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या घरी जात होता. संबंधितांना लग्नासाठी प्रवृत्त करून वेळोवळी तो आर्थिक फायदा करून घेत असे. काही महिलांशी विवाह करून त्याने त्यांची फसवणूक केली. घटस्फोटिता, विधवा यांना त्यांच्या मुलांचे संगोपन करेन, असे आश्वासन देऊन संशयिताने जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे.

पीडित महिलांची दक्षता

एका पीडित महिलेने फसवणूक झालेल्या इतर महिलांची माहिती घेऊन संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देता यावे म्हणून सर्व पीडित महिलांचा व्हॉट्स अ‍ॅपवर गट तयार केला. त्या माध्यमातून संशयिताची माहिती पीडित महिला एकमेकांना देत होत्या. या माहितीच्या आधारे संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवली गेली. पीडित महिलेला भेटावयास संशयित नाशिकला येणार असल्याचे समजल्यावर पीडित महिलांनी नाशिकच्या महिलेला यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग येथील महिला नाशिक येथे मदतीसाठी धावल्या.

First Published on December 7, 2019 2:59 am

Web Title: man arrested for allegedly cheating 12 to 15 women after promising to marry them zws 70
Next Stories
1 बाहेर पडलेल्यांना लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
2 मंदीमुळे कारखाने संकटात
3 जिल्ह्यात हृदयरोगाने त्रस्त बालकांची संख्या ५०० पेक्षा अधिक
Just Now!
X