आपल्याकडे असणारे पिस्तूल नकली नसून ते खरे आहे हे दाखविण्याच्या नादात सुटलेल्या गोळीत एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे टागोरनगर भागात घडली. या प्रकारामागे कोणताही वाद नसून केवळ गंमत म्हणून नकली पिस्तूलातून हवेत गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, संशयित तसेच तक्रारदार यांच्याकडून परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याने पोलिसांनी मौन बाळगले आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपनगर परिसरातील शिवाजीनगर येथे राहणारा कृष्णा नंदकिशोर सूर्यवंशी (२८) हे शुक्रवारी पहाटे अडीच-तीनच्या सुमारास मित्रासमवेत टागोरनगर येथील प्रीती अपार्टमेंट परिसरात राहणारा मित्र प्रशांत अल्हाद पगारे याच्यासोबत गप्पा मारत होता. त्या वेळी प्रशांतने आपल्याजवळील पिस्तूल दाखविले. ते नकली असल्याचे कृष्णाने सांगितल्यावर प्रशांतने हवेत गोळीबार केला. पण त्या वेळी गोळी सुटली नाही. हे पिस्तूल खरे आहे हे दाखविण्यासाठी ते हाताळत असताना अचानक पिस्तूलातून गोळी सुटली आणि ती कृष्णाच्या छातीत लागल्याचे सांगितले जाते. जखमी झालेल्या कृष्णा सूर्यवंशी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित प्रशांतला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कृष्णाने पोलिसांना चुकीची माहिती दिली असून प्रत्यक्ष त्या ठिकाणी दोन-तीन व्यक्ती चर्चा करत होत्या. त्यांच्यात वाद झाल्यावर मध्यस्थी करताना कृष्णावर गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांच्या कामात अडथळा येत असून हा हल्ला खरा होता की बनावट, याविषयी पोलीस यंत्रणा माहिती मिळवत आहे.