08 March 2021

News Flash

भाजीपाल्यापेक्षा आंबे स्वस्त भाज्यांचे दर गगनाला

शेतातून काढलेल्या कृषिमालाची गुणवत्तेनुसार तीन वेगवेगळ्या गटात वर्गवारी केली जाते.

 

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना दुष्काळी स्थितीमुळे किरकोळ बाजारात हिरव्यागार भाजीपाल्यासह फळभाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या असून पाणीटंचाईसोबत महागाईचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहे. एरवी, डोळ्यात पाणी आणणारा कांदा १० ते १२ रुपये प्रति किलोने उपलब्ध असताना दुसरीकडे मेथीच्या जुडीसाठी ५० रुपये तर शेपू व पालकसाठी ३० रुपये मोजावे लागतात. इतर भाज्यांचे दरही ४० ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत गेल्यामुळे भाजी खरेदी करताना गृहिणींनी हात आखडता घेतला आहे. दुसरीकडे विविध प्रकारचे आंबे ४० ते ६० रुपये किलो या भावात उपलब्ध असून भाजीपाल्यापेक्षा त्यांचे भाव कमी असल्याचे लक्षात येते.

एरवी बाजार समित्यांमध्ये भाजीपाला मुबलक स्वरूपात उपलब्ध होऊन दर कमी झाल्यास व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांची साखळी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फारसा मिळू देत नाही. सध्या दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याच्या दरवाढीला आणखी एक भक्कम कारण मिळाले आहे. मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक पाणीटंचाईमुळे घटली आहे. यामुळे जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे दर उंचावले आहे. शेतातून काढलेल्या कृषिमालाची गुणवत्तेनुसार तीन वेगवेगळ्या गटात वर्गवारी केली जाते. यातील उत्कृष्ट दर्जाचा माल मुंबईसारख्या महानगरांमध्ये चांगला भाव प्राप्त करत असल्याने घाऊक बाजारात तो साहजिकच अधिकतम दर प्राप्त करतो. उर्वरित म्हणजे द्वितीय व तृतीय गटातील कृषिमाल त्याहून टप्प्या-टप्प्याने कमी दर प्राप्त करतात. उत्तर महाराष्ट्रातील शहरी भागात किरकोळ पद्धतीने विक्री होणाऱ्या कृषिमालात दुसऱ्या गटातील मालाचा आधिक्याने समावेश आहे. या व्यवस्थेत एखाद्या भाजीपाल्याचे दर उंचावले की, किरकोळ विक्रेते अधिकतम दर डोळ्यासमोर ठेवून आपले दर निश्चित करतात. या कार्य पद्धतीचा आर्थिक फटका अखेर ग्राहकांना सहन करावा लागतो.  नाशिक बाजार समितीत सध्या पालेभाज्या व फळभाज्यांची आवक अतिशय कमी झाली आहे. त्याची परिणती जूनच्या प्रारंभीच त्यांचे भाव गगनाला भिडण्यात झाली. घाऊक बाजारात भाव चांगलेच उंचावले आहेत. सध्या किरकोळ बाजारात बटाटा वगळता एकही भाजी ४० रुपये किलोच्या आतमध्ये मिळत नाही. दोडके व गिलके ही एरवी सर्वात कमी भाव असणारी भाजी. मात्र सध्या त्यांच्यासह कारल्याचेही भाव प्रत्येकी ८० रुपये किलो आहे. टोमॅटो ६० रुपये, वांगी ६०, ढोबळी मिरची ६०, भोपळा ४०, भेंडी ६०, बटाटा २० ते २५ रुपये किलो असे भाव असल्याची माहिती किरकोळ विक्रेते शंकर टाळकुटे यांनी दिली. दुष्काळामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर ४० रुपये जुडी, मेथी ५० रुपये, शेपू २० ते २५ रुपये तर कांदा पात ३० रुपये जुडी आहे. किरकोळ बाजारातील या स्थितीमुळे ग्राहक हात आखडून खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यास ग्राहक कुठूनही खरेदी करतात; परंतु भाव वाढल्यावर ते कुठे स्वस्त मिळेल, याचा शोध घेऊन भाजी बाजारात येतात, अशी प्रतिक्रियाही काही जणांनी नोंदविली. समाधानकारक पाऊस झाल्यास महिनाभराने हे भाव काहीसे कमी होतील, असा अंदाज वर्तवला जातो. यामुळे या स्थितीत लगेचच बदल होण्याची शक्यता नसल्याने गृहिणींनी अल्प प्रमाणात खरेदी वा कडधान्यासारखे पर्याय स्वीकारल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या आंब्यांची मुबलक आवक होत आहे. केसर, लंगडा, राजापुरी आंब्याचे भाव ४० ते ६० रुपयांच्या दरम्यान आहे. यामुळे अनेकांनी भाजीपाल्यापेक्षा तुलनेत स्वस्त असणाऱ्या आंब्यांना पसंती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:59 am

Web Title: mango prices cheaper than vegetable prices
टॅग : Vegetable Prices
Next Stories
1 अशोक काळे यांना पर्यावरणमित्र पुरस्कार
2 कळवण तालुक्यातील पाणी पळविण्याचा घाट
3 खेडय़ांच्या विकासावर उद्या अनुभव समाज मेळावा
Just Now!
X