ग्रामीण भागांत अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवरही दुष्काळाचे सावट

नाशिक : अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणाऱ्या ग्राहकांसमोर यंदा प्रतिकूल हवामानामुळे बोटावर मोजता येतील एवढेच पर्याय शिल्लक राहिल्याने त्याचा परिणाम दरावरही झाला आहे. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांना आपला हात काहीसा आखडता घ्यावा लागत आहे. यामुळे आंबे खरेदीचे प्रमाण कमी झाले असून दुसरीकडे ग्रामीण भागात अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवरही दुष्काळाचे सावट दिसून आले.

बाजारपेठेत हापूस, पायरी, बदाम आणि लालबाग हे आंबे प्रामुख्याने विक्रीसाठी उपलब्ध असून हापूस ५०० रुपये डझन, लालबाग ७० ते १०० रुपये किलो, पायरी १२० ते १५० रुपये किलो असा दर आंब्यांचा आहे. प्रतिकूल हवामानामुळे अद्याप केशर, लंगडा आणि दशहरा हे आंबे बाजारात आलेले नाहीत. जे आंबे उपलब्ध आहेत, त्यांची आवक अतिशय कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे भद्रकाली फळ बाजारातील घाऊक व्यापारी परेश ठक्कर यांनी सांगितले. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांकडून सरासरी पाच ते दहा किलो आंब्याची खरेदी केली जाते. मात्र हेच ग्राहक या दिवशी तीन ते सहा किलो खरेदी करून आर्थिक समीकरण जुळवताना पाहावयास मिळाले. म्हणजे ग्राहकांचा आंबा खरेदीला प्रतिसाद लाभला असला तरी खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही ठक्कर म्हणाले.

नाशिककरांना कोकणातील हापूसचा आस्वाद देण्याकरिता अक्षय्य तृतीयेच्या पाश्र्वभूमीवर आयोजिलेल्या कोकण आंबा महोत्सवात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. या ठिकाणी आंब्याची एक पेटी (दोन किलो) ५०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. आवक

कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे महोत्सवाचे संयोजक दत्ता भालेराव यांनी सांगितले. भाव अधिक असले तरी अवघ्या काही दिवसांत ८५०० पेटय़ा विकल्या गेल्या आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असून त्यामानाने माल कमी पडत असल्याचे भालेराव यांनी नमूद केले.

कर्ज काढून सण साजरा

ग्रामीण भागात सणावर दुष्काळाचे सावट राहिले. ग्रामीण भागातील कांदा, डाळिंब, शेवगा या नगदी पिकांचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढत सण साजरा करावा लागला. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने ग्रामीण भागातील खरेदी काही अंशी रोडावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.