18 February 2020

News Flash

शहरातून अनेक पक्ष्यांचे स्थलांतर, कबुतरांच्या संख्येत वाढ

सर्वेक्षणात कबुतरांची संख्या वाढली तर जलप्रदूषणात मोठय़ा संख्येने वाढ झाली.

नेचर क्लबच्या ‘चला पक्षी मोजू या’ उपक्रमातील निरीक्षण

नाशिक : नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या वतीने ‘चला पक्षी मोजू या’ हा उपक्रम शहर परिसरात राबविण्यात आला. सर्वेक्षणात कबुतरांची संख्या वाढली तर जलप्रदूषणात मोठय़ा संख्येने वाढ झाली. पाणकावळे, वीण करणाऱ्या बगळ्यांनी आपला मुक्काम गाडगे महाराज आश्रमशाळेतून हलविला असल्याचे समोर आले आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने आता पक्ष्यांनी पडून राहिलेल्या गाडीच्या डिक्कीत, गाडीच्या कोपऱ्यात घरटी बनविण्यास सुरुवात केली आहे.

संस्थेच्या वतीने जानेवारी महिन्यात शहरातील पक्ष्यांची गणना करून पक्षी जीवनावर होणारे परिणाम अभ्यासण्याचा प्रयत्न केला जातो. संस्थेच्या वतीने अमरधाम, गंगाघाट, गाडगे महाराज धर्मशाळा, नेहरू उद्यान, गोदापार्क, गंगापूर धरण आदी ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी पक्ष्यांच्या ४० प्रजाती आढळून आल्या.

शहरात कबुतरांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. नदीपात्रात गटारीचे पाणी साचले असून याठिकाणी पोंड हेरॉन हा पक्षी आढळून आला. याच ठिकाणी विद्युत मनोऱ्यावर घारीने घरटे केल्याचे दिसले. गाडगे महाराज धर्मशाळेत शेकडोंच्या संख्येने वीण करणारे बगळे आणि पानकावळे यांनी तेथून स्थलांतर केल्याचे आढळून आले.  शहरात मोठय़ा प्रमाणात नायलॉन मांजा झाडांवर लटकलेला असल्याचे दिसले. नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही तो उपलब्ध झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गोदापार्क परिसरात कबुतराचा मांज्यात अडकून मृत्यू झाल्याचे दिसले. संस्थेतर्फे नायलॉन मांजा जमा करण्याची मोहीमदेखील राबविण्यात आली. गोदाघाटावर मोठय़ा प्रमाणात मांजा मिळाला.किंगफिशर हा स्वच्छ पाण्यात राहणारा पक्षी असून त्याने गोदापार्कपासून दूर जाणे पसंद केल्याने गोदावरीमधील प्रदूषण वाढल्याचे ते संकेत आहे. पोपटांनीदेखील घरांचा आश्रय घेतला आहे. शहरात वाडे, बंगले कमी झाल्याने तसेच झाडे कमी झाल्याने अनेक पक्षी चक्क इमारतीचा सज्जा, गाडीच्या डिकीमध्ये घरटे करताना दिसू लागली आहेत. शहराजवळ होणाऱ्या नवीन गृह प्रकल्पांमुळेही अनेक पक्षी शहर सोडून जात असून मोरांची संख्यादेखील या कारणामुळे कमी झाली आहे. यावेळी खंडय़ा, तांबट, ग्रे हेरॉन, दयाळ, शिंपी, धोबी, कोकिळा, भारद्वाज, रामगंगा, बुलबुल, पौंड हेरॉन, वारकरी, विजन, हळदी कुंकू आदी पक्ष्यांचे दर्शन झाले.

उपक्रमात उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, किशोर वडनेरे, उमेश नागरे, डॉ. सीमा पाटील, प्रमिला पाटील, सागर बनकर, मनोज वाघमारे, चेतन राजापूरकर आदी सहभागी झाले होते.

First Published on January 21, 2020 3:48 am

Web Title: many birds migrate from nashik city zws 70
Next Stories
1 नादुरुस्त वीज रोहित्रांची ग्रामीण आमदारांना डोकेदुखी
2 पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात – रावसाहेब दानवे
3 थंडीच्या कडाक्यात वाढ
Just Now!
X