काही नाल्यांचे प्रवाह गटारांना जोडले; औद्योगिक वसाहतीत गटार, प्रक्रिया केंद्र रखडलेलेच

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येऊन मिळणारे अनेक नाले कोरडे ठणठणीत, तर काही नाले प्रवाही आहेत. त्यातील काहींचे प्रवाह आसपासच्या पावसाळी, भुयारी गटार योजनेच्या वाहिन्यांमध्ये जोडले जात आहे. तपोवन परिसरात ओझोनायझेशन प्रक्रियेद्वारे गोदा पात्रातील पाण्यावरील फेस कमी होईल, अशी निरीक्षणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मांडण्यात आली. औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारीचे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्राचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे.

महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलत आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणावर चर्चा होत असली तरी सांडपाण्यासाठी व्यवस्था, प्रक्रिया याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार या वेळी मांडण्यात आली.

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासंबंधीची जबाबदारी असणाऱ्या विविध विभागांच्या स्तरावर उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या इतिवृत्तावरून शहरातील अनेक नाल्यांमधून गोदावरीच्या पात्रात प्रदूषित पाणी मिसळत नसल्याचे यंत्रणांकडून सूचित करण्यात आले आहे. प्रत्येक नाल्याची आधीची स्थिती आणि आताची स्थिती याविषयीची माहिती मांडली गेली.

गंगापूर नाल्याचा प्रवाह गंगापूर मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यात आला असून या केंद्राची १८ एमएलडी क्षमता आहे.

सर्व मलजल तिकडे वळविले जाते. त्यामुळे नाल्यातून नदीत पाणी मिसळत नाही. बारदान फाटा नाला कोरडा, सोमेश्वर नालादेखील कोरडा पडला आहे. याआधी या नाल्यातील दूषित पाण्याचे नमुने घेतले गेले होते. या परिसरात भुटारी गटारीचे काम सुरू होते. आता नाल्यातील सांडपाणी गटार व्यवस्थेला जोडण्यात आले आहे. सध्या केवळ जमिनीतील पाण्याचा प्रवाह नाल्यातून वाहातो.

आनंदवल्ली बंधाऱ्यातही येऊन मिसणारा नाला कोरडा आहे. तिथे पात्रात गटारीचे पाणी जात नाही. चिखली नाला कोरडा पडला आहे. आसाराम बापू पुलालगतच्या नाल्याची तीच स्थिती आहे. गेल्या वेळी चोपडा नाल्यातून गटारीचे पाणी पात्रात मिसळत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. या क्षेत्रातील गटारीचे पाणी गटारीत वळविण्याचे काम ७० टक्के झाले आहे. लेंडी नाल्यातून पात्रात सांडपाणी मिसळू नये म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम हाती घेतले आहे. हे काम ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. टाळकुटेश्वर येथील नाला कोरडा आहे.

तपोवनच्या खालील भागात गोदापात्रात अनेकदा फेसाळयुक्त पाणी दृष्टीस पडत आहे. त्यावर ओझोनायझेशन प्रक्रियेद्वारे तोडगा काढला जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

देवळाली कॅम्प येथील नाल्यातून सांडपाणी वालदेवीला येऊन मिसळते. गेल्या वेळी उपस्थित झालेल्या या मुद्यावर सुंदर नाल्यातील सांडपाणी भुयारी गटारीकडे वळविण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले.

याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणाविषयी आपण चर्चा करत असलो तरी सांडपाणी, मलजल या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आणले. या भागात सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी मलनिस्सारण केंद्र आणि गटारींचे जाळे उभारण्याचा विषय रखडलेला आहे.

न्यायालयाने ती जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर टाकली आहे. परंतु, महापालिका, औद्योगिक विकास महामंडळ ती एकमेकांवर ढकलतात. त्यामुळे ही बाब विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मांडावी, अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली.