नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मोजणी

पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती देशभरात पक्षी गणना करून साजरी करण्यात आली. नेचर क्लब ऑफ नाशिकने नांदुरमध्यमेश्वर परिसरात आगळा वेगळा उपक्रम राबवत अभयारण्याच्या बाजूला असलेले शेत, पडीक जागा, गवतांवर राहणाऱ्या पक्ष्यांची मोजणी आणि अभ्यास करत सलीम अलींना श्रद्धांजली वाहिली.

दरवर्षी वन विभाग केवळ पाण्यातील पाणपक्ष्यांचीच गणना करते. त्यामुळे गवतावरील पक्ष्यांची संख्या, जाती या कधी समोर येत नव्हत्या. या पक्ष्यांकडे लक्ष जावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शेतात साठून राहणाऱ्या पाण्यामुळे संस्थेच्या सदस्यांना मोठय़ा प्रमाणात पक्षी परिसरात दिसले. तीस जातीचे हजारो पक्षी यावेळी नोंदविण्यात आले. शेताजवळून गेलेल्या विजेच्या तारेवर पंधरा प्रकारचे पक्षी दिसून आले. यामध्ये वेडा राघू, खंडय़ा, डव, कापशी घार, बुलबुल, दयाल, कोतवाल आदी पक्ष्यांचे प्रमाण अधिक होते. शेताजवळ धान्य खाण्यासाठी मुनिया, सुगरण हे दोन्ही पक्षी हजारोंच्या संख्येने एकत्र राहत असल्याचे देखील दिसून आले. शेतात शिकारी पक्ष्यांची घरटी पाहावयास मिळाली तर विहिरींमध्ये सुगरणीची घरटी वाढल्याचे दिसून आले. शेतातील पाण्याच्या डबक्याजवळ, धरणातील पाण्याजवळ राहणारे अनेक पक्षी दिसले.

दलदलीच्या भागात ससाणा, जांभळा बगळा, कमळ पक्षी, राखी बगळा, मुग्ध बलाक, शेकाटय़ा, पांढऱ्या छातीची पाण कोंबडी, मोर शराटी, मालगुजा आदी पक्षी बघावयास मिळाले. या परिसरात बाभळीचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात असल्याने पक्ष्यांची संख्या देखील त्यामुळे अधिक आहे.

कापशी घारीचे घरटेही पाहावयास मिळाले. शेताजवळ दोन कोल्हे दिसले. धरणाच्या बाजूला गवतावरील पक्ष्यांच्या अनेक जाती असून वन विभागाने पाणथळ जागेबरोबर गवतावरील पक्ष्यांचीही गणना करावी, अशी मागणी संस्थेतर्फे केली जाणार आहे.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा, भीमराव राजोळे, अमोल दराडे, सागर बनकर, गंगाधर आघाव आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.