खासदारांकडून मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा

कृषी टर्मिनल मार्केट, कृषी महाविद्यालय, चित्रपट नगरी, औद्योगिक प्रदर्शन केंद्र, पेपर मिल, आदिवासींसाठी एसटी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र अशी केंद्र व राज्य शासनाशी संबंधित अनेक कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा मांडतांना गोडसे यांनी देवळाली छावणी परिषदेत भुयारी गटार योजनेअंतर्गत १५० कोटीच्या प्रकल्पातील पहिल्या ६० कोटीच्या टप्प्यास मान्यता मिळून १३ कोटी रुपये परिषदेकडे वर्ग करण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन २९ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते होणार असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील वाडय़ाची डागडुजी व उर्वरित भागाच्या नूतनीकरण कामाची सुरुवात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आठ ऑगस्ट २०१५ रोजी करण्यात येऊन काम पूर्ण झाल्याने उद्घाटन व लोकार्पण २८ मे रोजी खा. संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त प्रगतिप्रथावर असलेल्या व काही पूर्ण झालेल्या कामांचा उल्लेखही गोडसे यांनी केला आहे. त्यात १०३ कोटींच्या केंद्रीय रस्ते विकास अंतर्गत मंजूर कामांमध्ये पिंप्री सदो ते टाकेद हा ५० किमी रस्ता, ब्राम्हणवाडे ते बारागाव पिंप्री १६ किमी रस्ता, हरसूल-ठाणापाडा ते गुजरात सिमेपर्यंतचा ३७ किमीचा रस्ता, नाशिकरोड ते द्वारका ही रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून नाशिक-पेठ रस्ता कामही लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. नाशिक-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस पूर्वी कुर्ला टर्मिनसपर्यंत जात होती. रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस हा शेवटचा थांबा करण्यात आला तसेच पंचवटी एक्स्प्रेसही ठाणे येथे थांबू लागली. त्र्यंबकेश्वर टपाल कार्यालयात रिझव्‍‌र्हेशन कक्षासही मान्यता मिळाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात सिन्नर या दुष्काळी तालुक्यात नदी जोड प्रकल्पातंर्गत गारगाई, वाल या नद्यांच्या माध्यमातून अपर वैतरणा-कडवा-देव योजनेचा पूर्व शक्यता अहवाल सकारात्मक आला आहे. नाशिकचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी गोदावरी बृहत आराखडय़ात दमणगंगा योजनेचा समावेश करण्यात यश आल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे. यामुळे पाच टीएमसी पाणी कश्यपी धरणामार्गे गंगापूर धरणात येणार आहे. दमणगंगा, वैतरणा, कडवा, देवनदी यांचा समावेश दमणगंगा-पिंजाळ या राष्ट्रीय प्रकल्पात करण्याची मागणी राज्याने मान्य करून केंद्राला पत्र दिले आहे. ओझर विमानतळावरून हवाई प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी टर्मिनल इमारतीचा हस्तांतरणाचा वाद मिटविला. त्यानंतर दोनवेळा लहान विमानांची सेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, भाडे व इतर काही अडचणींमुळे ते बंद पडले. मुंबई विमानतळावर जागा मिळत नसल्याने एअर इंडियाकडून होणाऱ्या सेवेचा विषय प्रलंबित आहे. २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षांत पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून ९८ लाख मंजूर करून ५० रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये अनुकंपा तत्वावर पाच टक्के कामगारांचे वारसदार घेण्यास मान्यता मिळाली. कामगारांच्या बढती धोरणासही मान्यता मिळाली असून त्याचा फायदा शेकडो कामगारांना होणार आहे.

इलेक्ट्रिकल चाचणी प्रयोगशाळेसाठी भोपाळ व बंगळूरू येथे जावे लागते. आता शिलापूर येथे ही प्रयोगशाळा होणार असून अलीकडेच जागेचा करार झाला असून जागा हस्तांतरणानंतर लवकरच काम सुरू करण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्राने मान्यता दिली असून त्यासाठी पॅरिस येथे युनेस्को समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून नाशिक पूर्व विभागासाठी ६.७५ कोटींचे क्रीडा संकुल मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी वेळुंजे व त्या परिसरातील १५ ते २० गावांसाठी बीएसएनएलच्या माध्यमातून मोबाईल मनोऱ्यांचे काम पूर्ण करून घेण्यात आले. नाशिकमधील मेळा व सीबीएस या बस स्थानकांच्या नूतनीकरणासाठी अनुक्रमे चार कोटी व एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले. मौजे अंजनेरी येथील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर १७ कोटी रुपये मंजूर झाले असून काम सुरू आहे. सिन्नर-नाशिक आणि या दरम्यानच्या रस्ता कामात चुका झाल्या होत्या. डुबेरे, मनेगाव इतर गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पादचारी मार्ग दरण्यात आले होते. त्यामध्ये बदल करून वाहनांसाठी मार्ग सुचविण्यात आले. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर गोंदे ते पिंपळगाव बसवंत या दरम्यान द्वारका ते जत्रा या भागात के. के. वाघ महाविद्यालयापासून जत्रा हॉटेलपर्यंत उड्डाणपूल करण्यात येणार असून त्यास तांत्रिक सदस्य मंडळाची मान्यता आहे. ईएसएस रुग्णालयाचे रूपांतर लवकरच महामंडळात होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.