03 August 2020

News Flash

करोना भयाने अनेक दुकाने बंद

इंदिरानगर ठाण्यातील दोन पोलीस बाधित

संग्रहित छायाचित्र

इंदिरानगर ठाण्यातील दोन पोलीस बाधित

नाशिक : शहरात करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी बहुतांश व्यावसायिक स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवत असल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. सराफ बाजार संघटनेने तर पुढील आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या सोमवारी दुपापर्यंत पाच हजार ३९९ वर पोहोचली असून ७६ नवे रुग्ण आढळले आहेत.

शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल सकारात्मक आल्याने आधीच मनुष्यबळ कमी असलेल्या पोलीस आयुक्तालयासमोरील अडचणींमध्ये यामुळे भरच पडत आहे. शहरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वी मेनरोड, शालिमार, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, शिवाजी रोड या भागातील व्यापारी, दुकानदारांनी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महापालिका प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही दुकाने उघडली. असे असले तरी करोनाच्या भीतीने अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय बंदच ठेवले आहेत.

जिल्ह्य़ात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात केवळ एक असलेली करोनाग्रस्तांची संख्या जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात पाच हजार ३२३ वर पोहोचली आहे. जिल्ह्य़ात पुणे, मुंबई, औरंगाबादसह इतर ठिकाणांहून आलेल्या नागरिकांमुळे संसर्गात वाढ होणे सुरू झाले. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात काही नियम, अटी शिथिल होताच वाढलेली वर्दळही रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागाकडून तपासणीवर भर देण्यात येत आहे. घरच्या घरी विलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. सोमवारी दुपापर्यंत नाशिक शहरातील रामनगर, जुने नाशिक, अमृतधाम, मेरी लिंक रस्ता, संत कबीरनगर, देवळाली कॅम्प, जुना भगूर रोड, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या जवळील इमारत, सातपूर, पोकार कॉलनी, हिरावाडी, अष्टविनायकनगर, मखमलाबाद रस्ता, गोपाळनगर, संजयनगर, कथडा, मुंबई नाका अशा ठिकाणी नवीन रुग्ण आढळले आहेत.

दोन हजार ९८४ करोनाग्रस्त रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २७७ रुग्णांचा करोनामुळे बळी गेला असल्याची माहिती जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्ह्य़ात नाशिक ग्रामीणमध्ये ९१, चांदवड येथे सात, सिन्नर ८४, दिंडोरी ३६, निफाड  ७०, देवळा १९, नांदगाव ३८, येवला ६०, त्र्यंबकेश्वर २७, पेठ पाच, बागलाण २३, कळवण सात, इगतपुरी ३६, मालेगाव ग्रामीण २८ याप्रमाणे ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत. सुरगाणा तालुक्यात अद्याप एकही करोनाग्रस्त नाही.

इंदिरानगर पोलीस ठाण्यात पुन्हा करोना

नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत दोन उपनिरीक्षकांचे करोना नमुना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले. वडाळा या संवेदनशील भागात करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता या ठिकाणी असलेल्या गर्दीवर नियंत्रणाची जबाबदारी इंदिरानगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर देण्यात आली होती. सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर या भागांत करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना गावठाणावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या वेळी परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलीसांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. काही दिवसांपूर्वी इंदिरानगर ठाण्यातील हवालदाराचा करोनामुळे मृत्यू झाल्याने पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 3:07 am

Web Title: many shops closed in fear of coronavirus zws 70
Next Stories
1 शुल्क की वसुली? : ५०० रुपयांची पीपीई किट १०,५०० रुपयांना; दहा दिवस उपचार, उकळले पंधरा दिवसांचे पैसे
2 संपर्कातील व्यक्तींचे आता घरातच विलगीकरण
3 महापालिकेला एक कोटीची मदत
Just Now!
X